आशिष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोलीत लॅन्ड माइन्स स्फोटानंतर दादापूर गावात नक्षलवाद्यांकडून बॅनरबाजी करण्यात आलीय. बॅनरमध्ये हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत या भागात रस्ते निर्माणातील कंपन्यांना आणि ठेकेदारांना धमकी देण्यात आलीय. मंगळवारी रात्री नक्षल्यांनी १ मे रोजी जाळपोळ केलेल्या दादापूर गावी लाल रंगाचे बॅनर्स लावलेत. २७ एप्रिल रोजी गुंडूरवाही चकमकीत नक्षली कमांडर रामको नरोटी आणि अन्य एका महिला नक्षलीच्या हत्येचा निषेध केला. सरकारचा सर्वशक्तीनिशी विरोध करण्याचे आवाहन करण्यात आलंय. दुसऱ्या एका बॅनरमध्ये या भागात पूल-रस्ते निर्मितीला केला विरोध-सरकार भांडवलदारांचे बाहुले असल्याचा आरोप करण्यात आलंय. तर मोदी-फडणवीस यांचा विरोध करण्याचं आवाहनही याद्वारे करण्यात आलंय.
नक्षलवाद्यांनी ज्या गावात हे बॅनर लावले आहेत ते हल्ल्याच्या ठिकाणावरून १० किलोमीटर अंतरावर आहे. पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलंय. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केलीय.
गडचिरोलीतील लेंदारी पूल भुसुरुंग स्फोटाच्या घटनास्थळी जाण्यास सलग दुसऱ्या दिवशी खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलाय. पोलिसांनी गोठणगाव नाका इथून सुरक्षेसाठी मार्ग बंद केलाय. याठिकाणी मोठ्या संख्येत नक्षलविरोधी पथके स्फोटस्थळी तैनात करण्यात आलीत. वाहन जाळपोळ आणि स्फोट या पार्श्वभूमीवर घटनास्थळी पोलीस खबरदारी घेत आहेत. रात्री उशिरा पाऊस आणि अंधार यामुळे रखडलेले स्फोटस्थळाचे शोधकार्य अपूर्ण राहिल्याने मार्ग बंद केल्याची माहिती आहे.
गडचिरोलीत नक्षल्यांनी केलेल्या हल्ल्याच्या जखमा भळभळत आहेत. भूसुरूंग स्फोटात १५ जवान शहीद झाले. नक्षल्यांनी घडवून आणलेल्या या हिंसाचारामुळे संपूर्ण राज्याला हादरा बसलाय. आज दुपारी या शहिदांना गडचिरोलीत मानवंदना दिली जाणार आहे. पोलिसांनी आज पहाटेच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. जागोजागी पोलीस पथकं तैनात आहेत. पोलिसांकडून रस्त्याचा कोपरा न कोपरा, इंच न इंच तपासलं जात आहे.
थो़ड्याच वेळापूर्वी पोलीस महासंचालकांनी या भागाचा दौरा केला. घटनास्थळाची पाहणी केली. थोड्याच वेळात मुख्यमंत्री गडचिरोलीत दाखल होत आहेत. गडचिरोलीत शहिदांना मानवंदना देताना मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. मात्र घटनास्थळी मुख्यमंत्री जातील का? याबाबत अजूनही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.