NCP Chief Sharad Pawar On Ajit Pawar Absent For Govindbaug Diwali Padwa: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीमधील गोविंदबाग येथील निवासस्थानी आज दिवाळी पाडवा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. मात्र या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. याचसंदर्भात शरद पवारांना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी समज-गैरसमज करण्याची गरज नसल्याचा सल्ला पत्रकारांना दिला आहे.
शरद पवार यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सकाळपासूनच पवार यांच्या घरी समर्थकांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली होती. सर्व समर्थकांच्या भेटीगाठी घेऊन शुभेच्छा दिल्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये पवारांनी अगदी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणापासून अनेक विषयांवर आपलं मत मांडलं. पत्रकार परिषदेच्या शेवटी एका पत्रकाराने शरद पवारांना आज पवार कुटुंबातील सर्वजण जमलेले असताना आमदार रोहित पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित दिसत नाहीत, असं म्हणत प्रश्न विचारला. शरद पवारांनी या प्रश्नाला उत्तर देताना, "काही (सदस्य) कामानिमित्तबाहेर असतील. रोहित पवारांचा दौरा सुरु आहे असं मला नेते लोक सांगत होते," असं शरद पवार म्हणाले.
पुढे बोलताना शरद पवार यांनी थेट अजित पवारांचा उल्लेख न करता, "प्रत्येकाचे काही प्रश्न आहेत. कोणाचा आजार असेल. व्यक्तीगत आजार असेल त्यामुळे गैरहजर झाले असतील तर समज गैरसमज करण्याचं कारण नाही," असं म्हणाले. तसेच पुढे बोलताना शरद पवारांनी, "तुम्ही स्थानिक पत्रकार आहात. लोक शुभेच्छा द्यायला येतात त्याच्यात (त्या संख्येत) तुम्हाला काही कमतरता दिसली का?" असा प्रश्न विचारला. त्यावर, "नाही.. वाढली" असं उत्तर पत्रकारांनी दिलं.
अजित पवारांच्या अनुपस्थितीसंदर्भात शरद पवारांपूर्वी सकाळीच प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी, “दादाला (अजित पवार) डेंग्यू झाल्याचं सगळ्यांनाच माहीत आहे. मागील 20 ते 25 दिवसांपासून दादा कुठल्याच कार्यक्रमांना गेलेला नाही. रणजीत पवार आहेत आणि इतरही भाऊ आहेत," असं म्हटलं. पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी, "मला असं वाटतं की जी गोष्ट आहे ती मोठ्या मनाने स्वीकारली पाहिजे. आहे त्या वास्तवात जगलं पाहिजे. अर्धा ग्लास कधीही रिकामा नसतो हे लक्षात ठेवलं पाहिजे,” असं सूचक विधान केलं.
आपल्यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची असल्याचं सांगताना सुप्रिया सुळेंनी रोहित पवारही पाडव्यानिमित्त गोविंदबागेत नाही असं म्हटलं आहे. “माझ्यासाठी माझ्या कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे. प्रत्येकजण आपली तब्बेत, जबाबदाऱ्या सांभाळतोय. आज रोहितही इथे आलेला नाही. तो संघर्ष यात्रेसाठी बीडला आहे. रोहितचा आम्हा सगळ्यांनाच सार्थ अभिमान आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शनिवारीच शरद पवार आणि अजित पवार हे दिवाळीनिमित्त प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी एकमेकांना भेटले होते. मात्र आज दिवाळी पाडव्याला अजित पवार गोविंदबागेकडे फिरकले नाहीत.