मुंबई : माथेरानला येणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर आहे. आजपासून अमन लॉज ते माथेरान या मार्गावर मिनीट्रेनच्या फेऱ्या वाढवण्या आल्यात. अनलॉक फेजमध्ये माथेरानला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झालीय. त्यामुळे माथेरानच्या शटल सेवेतही वाढ करण्याचा निर्णय मध्यरेल्वे प्रशासनाने घेतला. आता शटलच्या रोज 7 फेऱ्या होतील. माथेरानसाठी पहिली गाडी सकाळी साडेनऊ वाजता सुटेल तर माथेरान येथून शेवटची गाडी संध्याकाळी 4 वाजून 25 मिनीटांनी सुटेल. सध्या प्रवासाचं भाडे 45 रूपये तर लहान मुलांसाठी 30 रूपये इतकं आहे.
फर्स्टक्लाससाठी मोठया व्यक्तींना 300 रूपये तर लहान मुलासाठी 180 रूपये तिकीट आकारण्यात येतंय . या वाढीव फेऱ्यांचा फायदा पर्यटकांबरोबरच स्थानिक रहिवाशांनाही होणार आहे .
थंडीच्यावेळी सर्वाधिक पसंतीचं ठिकाणं म्हणून माथेरानची निवड हमखास केली जाते. मुंबईपासून 94 किलोमीटर, लोणावळ्यापासून 56 किलोमीटर तर पुण्यापासून 122 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
महाराष्ट्र पर्यावरण आणि वनविभागाने हे इको सेंसेटीव्ह झोन म्हणून निवडलंय. निसर्गाच्या साखळीत महत्वाचे असणारी अनेक झाडं, लहान-मोठे प्राणी तुम्हाला इथे पाहायला मिळतील.
इथे एकाच ठिकाणी तुम्हाला 38 व्ह्यू पॉईंट दिसतील. तुम्हाला इथे जाण्यासाठी 5,500 रुपयांपासून पुढे खर्च येऊ शकतो.