'मोदींच्या नेतृत्वाला आव्हान कोण देणार? सगळेच घाबरलेत'

पाच राज्यांच्या निकालानंतर भाजपचे बंडखोर नाराज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल चढवलाय.  

Updated: Dec 12, 2018, 08:08 PM IST
'मोदींच्या नेतृत्वाला आव्हान कोण देणार? सगळेच घाबरलेत' title=

पुणे : पाच राज्यांच्या निकालानंतर भाजपचे बंडखोर नाराज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल चढवलाय. ते आज येथे आले होते. त्यावेळी मोदींना खडेबोल सुनावलेत. केंद्रीय कॅबिनेट (मंत्रिमंडळ) हे देशाच्या कार्यपालिकेतील सर्वात महत्वाचे. पंतप्रधान हे या कॅबिनेटचे फक्त प्रमुख आहे. मात्र, सर्व कारभार ते आपल्याच कार्यालयातून चालवतात. त्यामुळे काही मंत्री ट्विटर मंत्रीच आहेत. तसेच भाजप आता फक्त मोदींची आहे. तीन राज्यातील पराभवानंतरही भाजपमधून मोदींच्या नेतृत्वाला आव्हान मिळणार नाही, कारण सर्व घाबरलेले आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला.

केवळ ट्विटर मंत्री म्हणू काम

भाजपमध्ये अनेक चाटूकार लोक आहेत. ज्यांनी एका व्यक्तीला देवाची जागा देऊन टाकली. त्यामुळे देव चूक करु शकत नाही, असा समज झाला आहे. त्यामुळे तीन राज्यातील पराभवानंतरही भाजपमधून मोदींच्या नेतृत्वाला आव्हान मिळणार नाही. कारण, सर्व घाबरलेले आहे. कारण भाजप आता फक्त मोदींची आहे. सुषमा स्वराज यांनी पुढील लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर विदिशामध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. हा योगायोग बरेच काही सांगणारा आहे. सुषमा स्वराज या विदेश मंत्री नाहीत तर त्या केवळ ट्विटर मंत्री बनून राहील्या आहेत, अशी बोचरी टीका यशवंत सिन्हा यांनी केली.

'उपोषण केले मात्र, विरोधकांशी चर्चा नाही'

केंद्रीय मंत्रिमंडळ हे देशाच्या कार्यपालिकेतील सर्वात महत्वाचे आहे. पंतप्रधान हे या कॅबिनेटचे फक्त प्रमुख आहे. सर्व कॅबिनेट सारखीच आहे. मात्र आता ती परिस्थिती राहीलेली नाही. आताच्या पंतप्रधानांनी सर्व कॅबिनेटचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. त्यांच्या कार्यालयातूनच सर्व खात्यांचा कारभार चालतो. तसेच विरोधी पक्ष संसदेचे कामकाज चालू देत नाहीत. म्हणून पंतप्रधानांनी एक दिवसाचे उपोषण केले. मात्र एकदाही विरोधकांशी चर्चा केली नाही. किंवा विरोधकांचे म्हणणे ऐकुन घेतले नाही, असा यांचा कारभार आहे, अशी टीका त्यांनी मोदी कारभारावर केली.

मोदींनी मोठे निर्णय परस्पर घेतले!

फ्रान्सकडून 36 राफेल विमान खरेदी करण्याचा निर्णय पंतप्रधानांचा आहे. संरक्षण मंत्र्यांना न सांगता हा निर्णय घेण्यात आला. अर्थमंत्र्यांना न सांगता नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला. आणि गृहमंत्र्यांना माहीती नसताना जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारचा पाठींबा भाजपने काढला आणि राष्ट्रपती राजवट लागू केली. एकहाती सत्ता आणि निर्णय हा मोदींचा आहे, असा घणाघात सिन्हा यांनी केला. 

भाजपला इशारा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना यापुढे पप्पू म्हणताना यापुढे दहा वेळा भाजपला विचार करावा लागेल. तीन राज्यात जो पक्ष जिंकला आहे. त्याचाही इतिहास असा नाही. की ज्यावर आपण गर्व करु शको. त्यामुळे नागरिकांनाच सावध राहवे लागणार आहे. मोदींच्या विरोधात कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र तो निरर्थक आहे. मोदीनंतर नेतृत्व करु शकेल देशात असा एकही माणूस नाही का? तशी माणसं आहेत. आणि जनताच मोदींना पर्याय देईल. भाजप पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक अध्यक्षीय पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेल. तो विरोधकांनी हाणून पाडावा, असे आवाहन यशवंत सिन्हा यांनी केले.

'चौथा स्तंभ कोसळला'

2019 मध्ये भाजपच्या जागा लोकसभेत कमी झाल्या तरी नितीन गडकरी यांना नेतृत्वाची संधी मिळेल, असे वाटत नाही. कारण पक्षावर दोनच लोकांची पकड आहे. त्यांच्यासमोर कोणाचे काही चालेल असे वाटत नाही. देशात नॉर्थ कोरीयन चॅनेल आली आहेत का, अशी परीस्थिती निर्माण झाली आहे. चौथा स्तंभ कोसळला आहे. देशातील माध्यमं कॉर्पोरेट हाऊसपासून मुक्त झाली पाहीजेत, असे यशवंत सिन्हा म्हणालेत.

'आरएसएसचा अजेंडा चालवला' 

दरम्यान, विकासांचा अजेंडा पुढे ठेऊन भाजप सरकार सत्तेत आले होते. मात्र त्यांनी त्याऐवजी आरएसएसचा अजेंडा चालवला. मी मंत्रीपदाचा राजिनामा दिलाय. पुढे कुणासोबत जायचे याबाबत अनेक पर्याय खुले आहेत. आम्ही पक्ष पातळीवर त्याबाबत निर्णय घेऊ, असे प्रतिपादन उपेंद्र कुशवाह यांनी केले. त्यांनी सोमवारी मोदी सरकारमधून बाहेर पडताना मंत्री पदाचा राजीनामा दिला आणि एनडीएचा त्याग केला.