शहापूर : प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात उपचाराविना एक आदिवासी गरोदर महिला प्रसुत होण्याची संतापजनक घटना शहापूर तालुक्यात घडली.
टाकीपठार येथील आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि एकही आरोग्य कर्मचारी नसल्याने आवारातच प्रसुत होण्याची वेळ महिलेवर आली.
पीडित महिलेला पुढील उपचारासाठी शेणवा आरोग्य केंद्रात हालवावे लागले आहे. शहापूर तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या खरपत (सावरोली ) येथीस अलका मेंगाळ या २८ वर्षीय आदिवासी महिलेला प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्याने तिच्या नवऱ्याने खरपतवरून खाजगी वाहनाने टाकीपठार आरोग्य केंद्रात दाखल केले.
मात्र, कुलुपबंद असलेल्या आरोग्य केंद्राच्या आवारात खाली जमीनीवर सदर महिलेला उपचारासाठी वाट पहावी लागली... आणि अखेर ती आवारातच प्रसुत झाली.
त्यानंतर दोन तास वाट पाहूनही डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी न आल्याने शेवटी तिचा पती महेश मेंगाळ याने पत्नीला किन्हवली येथे आणले. परंतु, तिथेही डॉक्टर नसल्याने दुपारी ३ वाजता शेणवे येथील आरोग्य केंद्रात दाखल केले.
या घटनेनंतर गैरहजर राहणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.