आता रस्त्यावर दंडुका घेऊनच उभा राहणार; बघतोच सरकार काय करते?- नितेश राणे

दररोज सकाळी सात वाजता मी याठिकाणी पोहोचेल.

Updated: Jul 4, 2019, 06:01 PM IST
आता रस्त्यावर दंडुका घेऊनच उभा राहणार; बघतोच सरकार काय करते?- नितेश राणे title=

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून सरकारी कर्मचाऱ्याला चिखलाने आंघोळ घातल्यानंतर आमदार नितेश राणे आणखीनच आक्रमक झाले आहेत. आता मी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीचे काम पाहण्यासाठी रस्त्यावर दंडुका घेऊनच उभा राहणार आहे. दररोज सकाळी सात वाजता मी याठिकाणी पोहोचेल. मला बघायचेच आहे की, सरकारी व्यवस्था आमच्याविरुद्ध जिंकूच कशी शकते? सरकारच्या मुजोरपणाला लगाम कसा घालायाचा, हे आम्हाला पक्के ठाऊक असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले. 

तत्पूर्वी नितेश राणे यांनी गुरुवारी सकाळी मु्ंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांसाठी सरकारला जबाबदार धरत महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना चिखलाने आंघोळ घातली. नितेश राणे यांच्या उपस्थितीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर बादलीतून आणलेला चिखल ओतला. यानंतर प्रकाश शेडेकर यांना गडनदीवरील पुलावर बांधूनही ठेवण्यात आले होते. 

या घटनेमुळे नितेश आज दिवसभर चांगलेच चर्चेत राहिले. मात्र, या प्रकारानंतर नारायण राणे यांनी मात्र आपल्या मुलाचे कान टोचले आहेत. महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून आंदोलन करण्यात काही गैर नाही. मात्र, नितेशच्या समर्थकांनी केलेल्या हिंसक कृतीचे समर्थन करता येणार नाही. मी कदापि त्याला पाठिंबा देणार नाही, असे नारायण राणे यांनी सांगितले. 

आमदार नितेश राणेंसह समर्थकांनी महामार्ग अभियंत्यावर ओतला चिखल

काही दिवसांपूर्वी कणकवलीती बाजारपेठेमध्ये पाणी घुसले होते. दरम्यान, महामार्गावरील चिखल आणि खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी अखेर आज आपला रोष महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यासमोर व्यक्त केला.