नागपूर : आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात संधी देण्याचं आमिष दाखवून सहा मॉडेल्सची फसवणूक केल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. सीमा सपकाळ आणि त्यांच्या सहकारी मॉडेल्सला फेसबूकवर व्हिक्टोरीया सिक्रेट फोटो शूट प्रोजेक्टची जाहिरात दिसली. त्यांनी संपर्क साधला असता त्यांना सिंटा कार्ड आवश्यक असल्याचं सांगितलं. सीमा यांनी सहा मॉडेल्ससाठी लागणारे ५२ हजार रुपये ऑनलाईन त्यांच्याकडे जमा केले.
दरम्यान इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या प्रतिनिधीनं मॉडेल्सच्या फोनवर मुलाखती घेतल्या. मात्र पैसे भरल्यानंतर इव्हेंट आयोजकांचा फोन बंद झाला. त्यामुळं आपली फसवणूक झाल्याचं सीमा यांच्या लक्षात आलं.
याआधी देखील अशीच घटना समोर आली होती. सोशल मीडियावर एक जाहिरातीच्या माध्यमातून एका इव्हेंटसाठी फोटोशूट असल्याचं सांगून जवळपास ३० मॉडेल्सची फसवणूक करण्यात आली होती. सुरुवातीला करारासाठी १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ९ दिवसांच्या शूटसाठी १ लाख ३५ हजार रुपये मिळणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण नंतर काहीच उत्तर न मिळाल्याने या मॉडेलन पोलिसात तक्रार दाखल केली.
मुंबई पोलिसांची एक टीम दिल्लीत गेली आणि त्यांनी आरोपीला अटक केली. ज्यामध्ये त्याने अशा अनेक मॉडेल्सला फसवल्याचं समोर आलं. त्यामुळे अशा गोष्टींपासून सावध राहण्याची गरज आहे.