पालघर : तलासरीतल्या कवाडा-ठाकरपाड्याच्या जिल्हापरिषद शाळेत आज (सोमवार, २८ मे) दिवंगत खासदार अॅड. चिंतामण वनगा यांच्या कुटुंबियांनी मतदान केलं. यावेळी वनगांच्या पत्नीला त्यांच्या आठवणीनं अश्रू अनावर झाले. या वेळी बोलताना मतदारांमध्ये उत्साह असल्याचं शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांनी सांगितले.
विरार पश्चिमेला असलेल्या मतदान केंद्रावर बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला. बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव पालघरमध्ये निवडणूक लढत आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या सोबत त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर, उत्तुंग ठाकूर आणि शिखर ठाकूर हे सुद्धा मतदानाला हजर होते. अनेक ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याची तक्रार यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी केली.
आज भंडारा गोंदिया जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणूक पार पडत असून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळ पासूनच ग्रामीण भागात मतदानासाठी उत्सुकता दिसत आहे. एकूण १७ लाख ५९ हजार ९७७ मतदार असून ते आज आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. लोकसभा पोट निवडणूकीसाठी प्रथमच व्हिव्हिपॅट वापरण्यात येत आहेत. निवडणुकीत एकूण १८ उमेदवार रिंगणात आहेत. मुख्य लढत भाजप व काँगेस व राष्ट्रवादी काँगेस मध्ये आहे , भाजप कडून हेमंत पटले याना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँगेसचे मधुकर कुकडे यांना तिकीट देण्यात आलंय. निवडणुकीत भल्याभल्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून भाजप करिता अस्तित्वाची तर काँगेस व राष्ट्रवादी काँगेस करिता प्रतिष्ठेची लढाई आहे.