बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभांमध्ये 'मी परत येईन' असं कवितेतून सांगतायत. मात्र भाजपातल्या काही नेत्यांची आणि विशेषतः त्यांच्या कार्यकर्त्यांची महत्त्वाकांक्षा अद्याप कायम आहे. गेल्या पाच वर्षांत पंकजा मुंडे यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. भाजपाची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची उत्कंठा असताना अनेकांना अपेक्षा होती.
मात्र पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात माळ घातली. आता पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी रंगली असताना पंकजाताईंनी बीडमध्ये भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना आणलं. शाह यांचं भाषण सुरू होताच मुंडे समर्थकांनी 'सीएम सीएम' अशा घोषणा द्यायला सुरूवात केली.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री या कार्यक्रमात हजर नसताना हा प्रकार घडला. अर्थात ही कार्यकर्त्यांची भावना होती. आपल्या मनात असं काही नाही असं सांगायची वेळ पंकजांवर आली.
खासदार प्रीतम मुंडे यांनी मात्र पंकजा मुख्यमंत्री होऊ शकतात, असं सांगत या चर्चेला हवा दिली. जर पक्षानं महिला मुख्यमंत्री करायचं ठरवलं तर पंकजांशिवाय भाजपात सध्यातरी दुसरं नाव नाही असं त्यांचं म्हणणं आहे.
पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊन पंकजाताई इतिहास घडवू शकतात हे खरं आहे. मात्र फडणवीसांची मजबुत पकड आणि पंकजांवर झालेल्या चिक्की, मोबाईल घोटाळ्यासारखे आरोप पाहता सध्यातरी हे स्वप्न पूर्ण होणं अवघड दिसतंय.