पनवेल आणि चिंचवड ठरवणार मावळचा खासदार

श्रींचा 'रंग' उधळणार की पवारांचं महत्त्व 'सार्थ' होणार हे २३ मे लाच कळणार आहे.

Updated: May 17, 2019, 02:41 PM IST
पनवेल आणि चिंचवड ठरवणार मावळचा खासदार title=

मावळ : बहुचर्चित मावळ लोकसभा मतदार संघात ५९.४९ टक्के मतदान झाले आहे. पनवेल आणि चिंचवड या मतदार संघात कमी झालेल्या मतदानामुळे सेनेच्या गोटात टेंशन वाढलं आहे. तर राष्ट्रवादीचा आशावाद वाढला आहे. शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे मावळ लोकसभा मतदार संघ चर्चेत आला आहे. सलग दोन वेळा जिंकलेला सेनेचा हा अभेद्य गड पार्थ यांच्या उमेदवारी घोषित होताच काहीसा खिळखिळा होऊ लागला. तरीही सेनेच्या श्रीरंग बारणे यांनी ही घाबरून न जाता चांगली टक्कर दिली. 

मावळमध्ये ज्या पद्धतीने मतदान झालं ते पाहता कोणालाही धक्का लागू शकतो. मावळमध्ये ५९.४९ टक्के मतदान झालं. आणि सर्वाधिक मतदार असलेल्या पनवेल आणि चिंचवडमधील मतदान निर्णायक ठरणार आहे. पनवेलमध्ये २,९८,३४९ आणि चिंचवडमध्ये २,८३,००४ मतदान झाले आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघात जो कोणी उमेदवार अधिकची आघाडी घेईल त्याचा विजय निश्चित होणार असल्याचे मानले जात आहे. 

मावळमध्ये विधानसभा मतदार संघ निहाय झालेले मतदान.

पनवेल - ५५.३३%
कर्जत - ६७.७६%
उरण - ६७.२१%
मावळ - ६२.६०%
चिंचवड - ५६.२९%
पिंपरी - ५४.४६%

ही आकडेवारी पाहता कर्जत, उरण या शेकाप राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अधिक मतदान झालं आहे. येथे घड्याळाची टिक टिक जोरात चालल्याची चर्चा आहे. पनवेलमध्ये सेनेला आघाडीची आशा होती. येथे ५५.३३ टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे सेनेची धाकधूक वाढली आहे. मावळ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. पण येथे राष्ट्रवादीचे सर्व गट एकत्र आल्याने सेनेला चांगलीच टक्कर मिळाली आहे. पण येथे ६२.६० टक्के मतदान झालं. त्यामुळे वाढलेल्या मतदानाचा फायदा होण्याची आशा सेनेला आहे. 

पिंपरीमध्ये मात्र घड्याळाचे काटे वेगात फिरल्याची चर्चा आहे. पण चिंचवडमध्ये धनुष्य बाणाची जोरदार चर्चा आहे. एकूणच मावळमध्ये चिंचवड आणि पनवेलमध्ये कोण किती आघाडी घेतो. यावरच श्रींचा रंग उधळणार की पवारांचं महत्त्व सार्थ होणार हे २३ मे लाच कळणार आहे.