PM Modi Praises Raj Thackeray: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी एक दिवसीय दौऱ्यादरम्यान महायुतीच्या आमदारांशी संवाद साधला. या बैठकीमध्ये मोदींनी आमदारांना काही महत्त्वाचे सल्ले दिले. याच वेळेस बोलताना मोदींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा उल्लेख करत त्यांचं कौतुक महायुतीच्या आमदारांसमोर केलं. नेमकं मोदींनी राज ठाकरेंबद्दल कशासंदर्भात आणि काय म्हटलं जाणून घेऊयात...
लोकप्रतिनिधींनी नेमकं कसं काम करायला हवं? या संदर्भात मार्गदर्शक मोदींनी बैठकीत केलं. राजकीय जीवनातील आपले काही अनुभव सुद्धा मोदींनी आमदारांसमोर मांडले. सामान्यातल्या सामान्य माणसाचं काम लोकप्रतिनिधी केलं पाहिजे, सामान्य कार्यकर्ता म्हणून आपण जनसामान्यात वावरुन त्यांची काम केली पाहिजेत, असंही मोदी म्हणाले. सरकारमध्ये महायुतीतील पक्षांनी एकमेकांमध्ये समन्वय पाळला पाहिजे, अशी अपेक्षा पंतप्रधांनी व्यक्त केली. केंद्र आणि राज्य सरकारच्या सरकारी योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा त्यांचा लाभ त्यांना द्या, या काही सूचना सुद्धा मोदींनी आमदारांशी बोलताना केल्या.
पंतप्रधान मोदींनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच प्रत्यक्षपणे आमदारांशी संवाद साधताना त्यांना, "जनतेपर्यंत पोहोचा, जनसंपर्क वाढवा" असा सल्ला दिला. तसेच महायुतीमधील आमदारांना सल्ला देताना मोदींनी, "एकमेकांविषयी द्वेषभाव ठेवू नका. महायुती म्हणून काम करतांना समन्वय ठेवा," असं आवाहन केलं. तसेच पुढे बोलताना, "लोकप्रतिनीधींनी आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवं. नियमीत योगासने करा. कुटुंबाकडे लक्ष द्या. घरातील पत्नी- मुलेमुली यांकडेही लक्ष द्या," असंही पंतप्रधान म्हणाले.
त्याचप्रमाणे मोदींनी सर्व आमदारांना, जास्तीत जास्त धार्मिक कार्यक्रम घेण्याचा सल्ला दिला. तसेच, "अधिकाधिक वेळ जनतेत घालवा. जनतेशी सातत्याने संपर्कात राहा. ज्या व्यक्तींनी, घटकांनी मतदान केले नाही त्यांना देखील प्राधान्याने महत्त्व द्या. त्यांची ही काम प्राधान्याने करा. 100% मतदान कसं होईल यासाठी अधिकाधिक लोकोपयोगी कामे करा," असंही मोदींनी आमदारांना सांगितलं. "विरोधकांशी द्वेषपूर्ण वागणूक टाळा," असंही पंतप्रधान म्हणाले.
महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन करताना मोदींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केला. "दुस-या राज्यात किंवा मतदारसंघात एखादी गोष्ट चांगली असेल तर त्याबाबत अभ्यासदौरा करा," असा सल्ला पंतप्रधान मोदींनी भाषणादरम्यान महायुतीच्या आमदारांना दिला. यावेळी मोदींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुजरात दौ-यावर आले होते त्याचं उदाहरण उपस्थित आमदारांना देत राज ठाकरेंचं कौतुक केलं.
पंतप्रधान मोदी आज पालक स्वरुपात होते. महायुती आजच्या भेटीनं अधिक मजबुत झाली आहे. पंतप्रधान मोदींचं बोलणं ऐकुन आज मंत्रमुग्ध झालो. मोदी बोलत राहावेत आणि आम्ही ऐकत रहावं असं वाटत होतं. जनसेवेचा वसा घेऊन जनसंपर्क वाढवा हा सल्ला त्यांनी दिला. पुढे जाताना घराकडेही लक्ष द्या अशा सूचना त्यांनी केल्या. दिनचर्या कशी असावी, आरोग्य कसं राहावं याबाबत मार्गदर्शन केलं," असं भाजपाच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी या बैठकीनंतर म्हटलं.
"मोदीजींनी आम्हाला आमची दिनचर्या विचारली. त्यात कुटुंबाला कधी वेळ देतात ते विचारले. त्यांनी आम्हाला योग आणि आरोग्याचे महत्व सांगितले. आजचा अनुभव अविस्मरणीय होता. महायुती भक्कम आहे हे आजच्या बैठकीतून अधोरेखित झालं आहे. जनसंपर्क कसा वाढवावा हे मोदींनी सांगितले. मोदींनी स्वत: कश्या पद्धतीनं संघर्ष केला हे सांगितले. आज प्रचंड ऊर्जा घेऊन निघालो आहोत," अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाठ यांनी बैठकीनंतर नोंदवली.