विशाल करोळे, औरंगाबाद : औरंगाबादच्या कचरा प्रश्नावरून चांगलेच राजकारण रंगले, मुख्यमंत्र्यांनी कचरा प्रश्नावर बैठक बोलावली होती, त्याला भाजपचे नगरसेवक आणि सगळे अधिकारी गेले. मात्र शिवसेनेच्या महापौरांसह सगळ्याच पदाधिका-यांनी नागपूरच्या बैठकीकडे पाठ फिरवत थेट मुंबई गाठत मातोश्री जवळ केली, त्यामुळं मुख्यमंत्र्यांनीच थेट महापालिकेची खरडपट्टी काढल्याने जणू भूकंपच घडवला.
गेली 4 महिने औरंगाबादचा कचरा प्रश्न चांगलाच पेटला आहे, त्यावर अजूनही तोडगा काढू शकलं नाही, पावसाळ्यात कच-यामुळं नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, अशात याच प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नागपूरला तातडीची बैठक बोलावली, शिवसेना भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेतील सगळ्याच पदाधिका-यांनी बैठकीला जाणं अपेक्षीत होतं, मात्र तातडीनं मातोश्रीचाही बैठकीसाठी शिवसेनेच्या पदाधिका-यांना फोन आला, आणि मुख्यमंत्र्यांची बैठक सोडत शिवसेनेनं मातोश्री जवळ केली, तर औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर मुख्यमंत्री चांगलेच संतापले आणि त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली.
राजकारण आणि टीका सुरु झाल्यानं शिवसेनेनंही सारवासारव सुरु केली. विमान सुटल्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जाऊ शकलो नाही असे स्पष्टीकऱण औरंगाबादचे महापौर नंदू घोडेले यांनी दिलं आहे. शिवसेना भाजपची महापालिकेत सत्ता आहे, मात्र इतक्या महत्वाच्या बैठकीवरही शिवसेना आणि भाजपनं आपापल्या नेत्यांकडं जाण्यातच धन्यता मानली. यावरून खरचं या सगळ्यांना शहराच्या कचरा प्रश्नाबाबत गंभीरता आहे का असा प्रश्न पडतो आहे. जर कचयावरून हे राजकारण असंच सुरु राहिले, तर कचरा प्रश्न तर सुटणार नाही आणि एक दिवस खरंच महापालिका बरखास्तीची वेळ येईल हेच सत्य म्हणावं लागेल.