मुंबई : राज्यातून दरवर्षी लाखो विद्यार्थी यूपीएससी व एमपीएससीची परीक्षा देतात. मात्र, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे यूपीएससीमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. याकडे विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले.
ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षेत करिअर करायचे आहे, अशा विद्यार्थ्यांना मणिपूर युनिव्हर्सिटीमध्ये राबविला जाणारा अभ्यासक्रम राज्यातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावा. यामुळे स्पर्धा परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकेल, असे ते म्हणाले.
राज्यातील नामांकित विद्यापीठांमध्ये हा अभ्यासक्रम राबविण्याचा राज्य सरकारने विचार करावा, अशी मागणीही आमदार डावखरे यांनी केली. यावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, यूपीएससी व एमपीएससी सारख्या परीक्षांची तयारी करण्यासाठी मणिपूर युनिव्हर्सिटीमध्ये बॅचलर ऑफ सिव्हिल सर्व्हिस हा अभ्यासक्रम राबविण्यात येतो.
राज्यात स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचा असलेला बॅचलर ऑफ सिव्हिल सर्व्हिस हा अभ्यासक्रम राज्यात सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल. या संदर्भात समिती स्थापन करून ९० दिवसांमध्ये निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले.