मुंबई : पुण्यातल्या औंधमध्ये चोरांना पाहून पोबारा करणाऱ्या पोलिसांवर अखेर कारवाई करण्यात आलीय. पळ काढणाऱ्या दोन्ही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. पोलीस खात्याची प्रतीमा मलीन करणं आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. बंदूक, वायरलेस फोन असतानाही चोरांना पाहून दोन पोलिसांनी पळ काढला होता. पोलीस शिपाई अनिल अवघडे आणि पोलीस हवलदार प्रवीण गोरे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
पुण्यातल्या औंधमध्ये सिद्धार्थनगर भागातल्या, शैलेश टॉवर सोसायटीमध्ये २८ डिसेंबरला रात्री ३ च्या सुमाराला ४ चोरटे घुसले. वॉचमनला दोघांनी चाकू दाखवला आणि पकडून ठेवले. दोघांनी वर जाऊन कटरच्या सहाय्यानं फ्लॅटचं कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. रहिवाशांनी पोलिसांना फोन केला.
पोलीस गाडीवरून तात्काळ हजरही झाले. त्यांनी चोरांना पाहिलं पण बंदूक असतांनाही त्यांना पकडण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. त्याऐवजी पोलीस पळून जाताना दिसतायत. पोलीसांकडे वायरलेस फोन देखील होता.
त्यांनी ठरवलं असतं तर पोलिसांनी पुढे माहिती पाठवून चोरट्यांना तात्काळ पकडू शकले असते. पण या घटनेत पोलिसांकडून तसे काहीही झालेले दिसले नाही.