निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे : पुण्याच्या ससून रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलाय. ससून हॉस्पिटलचे (Sassoon Hospital) डॉक्टर बेवारस रुग्णांना रात्रीच्या वेळेस निर्जनस्थळी सोडून देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांनी हा व्हिडिओ समोर आणून बेवारस रुग्णाचे प्राण वाचवलेयत. रितेशने पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि दादासाहेब गायकवाड यांच्या मदतीने त्या रुग्णाना पुन्हा ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तसेच येरवडा पोलिस ठाण्यात (Yerwada Police) याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर ससून रुग्णालयानेही डॉक्टर आदी कुमार यांचं निलंबन केलंय.
काय आहे नेमकी घटना?
पुण्यातील ससून हॉस्पिटल गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात राहिलं आहे. ललित पाटील ड्रग्स प्रकरण असो की रक्ताचे नमुने फेरफार तर कधी रुग्णांना उंदीर चावणे अशा अनेक भोंगळ कारभारा मुळे ससून हे चर्चेत आहे आणि आता तर चक्क बेवारस रुग्णांना रात्रीच्या वेळेस निर्जनस्थळी सोडून देता असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ज्या रिक्षातून बेवारस रुग्णाला सोडण्यात आलं त्या रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांनी हा संपूर्ण प्रकार मोबाईल मध्ये चित्रित केलाय
निर्जनस्थळी सोडण्यास सांगितलं
दादासाहेब गायकवाड हे बेवारस रुग्णांची सेवा करतात, रस्त्यावर बेवारस पडलेल्या जखमी व्यक्तींना ते ससून रुग्णालयात दाखल करतात. दीड वर्षांपूर्वी अशाच एका बेवारस रुग्णाला त्यांनी ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं.
पण दुसऱ्या दिवशी त्या रुग्णाला पाहण्यासाठी गेल्यावर त्यांना तो रुग्ण गायब झाल्याचं लक्षात आलं. या संदर्भात चौकशी केल्यावर त्या रुग्णाला रात्री डॉक्टर घेऊन गेले परत आणलं नाही, अशी माहिती मिळाली. यावरून बेवारस रुग्णांसंदर्भात काहीतरी गैरप्रकार ससून रुग्णालयात सुरू असल्याचा संशय त्यांना आला. हा प्रकार उघडकीस आणण्यासाठी त्यांनी रितेश यांच्यासोबत ससून रुग्णालय बाहेर काही दिवसांपासून पाहणी सुरू केली.
सोमवारी पहाटे दीड वाजता रितेश रिक्षा घेऊन ससून रुग्णालयाबाहेर उभे होते. त्यावेळी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना रिक्षावाला असल्याचं समजून एका रुग्णाला सोडून यायचं आहे, येणार का अशी चौकशी केली. कुठे सोडायचंय अशी विचारल्यावर 'इथून लांब नेऊन सोड ,पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला नाही पाहिजे अशा ठिकाणी सोडायला सांगितलें' 'नेमके कुठे सोडू ? मी एकटा कसा सोडून नातेवाईक पाहिजे सोबत, असं रिते श यांनी विचातल्यावर तू नवीन आहेस, आमचा नेहमीचा रिक्षावाला पाचशे रुपये दिले की बरोबर सोडून येतो असं डॉक्टरांनी सांगितलं.
काही वेळाने डॉक्टरानी सांगितल्यानुसार नवीन बिल्डिंगमधला दोन्ही पाय नसलेला, आणि शरीरावर अनेक जखमा असलेला एक रुग्ण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रिक्षात ठेवला. त्या रुग्णाना घेऊन रिक्षासोबत डॉक्टर आणि त्यांचा सहकारी विश्रांतवाडी इथल्या एका दाट वडाच्या झाडाजवळ पोहचले. अंधारात आणि पावसात त्या रुग्णाला त्या झाडाखाली सोडून डॉक्टर निघून गेले.
तो रुग्ण कोण?
ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी निर्जनस्थळी ज्या रुग्णाला निर्जनस्थळी सोडला तो रुग्ण मूळ मध्यप्रदेशमधील आहे. 27 जूनला हा रुग्ण ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. अपघातात त्याचे दोन्ही पाय गेल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. पण तो बेवारस असल्याने त्याला दोन दिवसांपूर्वी मलम पट्टी करून ससून रुग्णालयातील डॉक्टर आदि कुमार यांनी रविवारी दीड वाजता रिक्षात बसून निर्जनस्थळी सोडण्यास सांगितलं. या प्रकरणी दादा गायकवाड यांच्या तक्रारीनुसार येरवडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. ससूनचे डीन एकनाथ पवार यांनी तत्काळ चौकशी समिती स्थापन करून डॉक्टर आदी कुमार यांचं निलंबन करण्यात आल्याचं सांगितलं
किती रुग्णांना निर्जनस्थळी सोडलं?
गेल्या अनेक वर्षांपासून बेवारस रुग्णांना किरकोळ उपचार करून निर्जन स्थळी सोडलं जात असल्याचा आरोप रुग्ण आधार फाउंडेशनचे दादा गायकवाड यांनी या आधी ही केला आहे. त्यामुळे ससूनमधील या गंभीर प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केलीय. रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा म्हणणाऱ्या ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरच रुग्णांच्या जीवावर उठलेत का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होते