Pune Double Decker Bus : आता पुणे शहरात 'डबल डेकर' बस धावणार

 Double Decker Bus : मुंबईनंतर आता पुण्यात 'डबल डेकर' बस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Updated: Feb 17, 2023, 02:06 PM IST
Pune Double Decker Bus : आता पुणे शहरात 'डबल डेकर' बस धावणार title=
Double Decker Bus

Pune Double Decker Bus : पुण्यातही आता 'डबल डेकर' बस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणेकरांच्या सार्वजनिक वाहन व्यवस्थेत 'डबल डेकर' बसचा सामावेश होणार आहे. गुरुवारी झालेल्या पीएमपीएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यानुसार पहिल्या टप्प्यात 20 इलेक्ट्रीक डबल डेकर बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून डबल बस सुरु करण्यावर चर्चा सुरु होती. गुरुवारी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPL) कार्यालयात संचालक मंडळाची बैठक पार पडली. बैठकीला पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह हे ऑनलाईन उपस्थित होते. या बसेस इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित असतील. त्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक मदत घेण्यात आली आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (PMPML) इलेक्ट्रिक डबल-डेकर बस खरेदी आणि चालविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे आणि या बसेस ज्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात धावतील अशा 40 मार्गांना अंतिम रुप दिले आहे. मार्ग निवडताना रस्त्यांची परिस्थिती आणि प्रवाशांचा प्रतिसाद विचारात घेण्यात आला आहे.  पीएमपीएमएलच्या आगामी बैठकीत या विषयावर चर्चा होणार असून त्यानंतर डबल डेकर बस खरेदीला गती दिली जाणार आहे. पीएमपीएमएलने शेअर केलेल्या माहितीनुसार, हडपसर, कात्रज आणि कर्वे रस्त्यावरील प्रवासी येत्या काही महिन्यांत डबलडेकर बसने प्रवास करु शकतील.

या डबलडेकर बसेस त्यांच्या उंची आणि डिझाइनमध्ये बदल केल्यामुळे बीआरटीएस मार्गांवर धावणार नाहीत. या नव्या बसेस 14 फूट आणि चार इंच उंचीच्या आहेत आणि त्यांची आसन क्षमता 70 प्रवासी आणि 40 प्रवासी उभे राहण्याची क्षमता आहे. प्रत्येक बसची साधारण किंमत 2 कोटी रुपये आहे. 90 च्या दशकाच्या सुरुवातीला, तत्कालीन पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्टने (PMT) पुण्यात डबल डेकर बस सेवा सुरु केली होती. जी मुख्यतः शिवाजीनगर आणि निगडी दरम्यान धावत होती कारण बहुतेक कार्यालये याच मार्गावर होती. नियोजनानुसार सर्व काही झाले तर पुन्हा एकदा डबलडेकर बस शहराच्या रस्त्यावर धावताना दिसतील.