झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये आदिवासी विभागातील लाचखोर अभियंत्याच्या घरी कोट्यवधींचं घबाड सापडलं आहे. दिनेशकुमार बागुल यांनी सेंट्रल किचन बिल मंजुर करण्यासाठी 28 लाखांची मागणी केली होती. ही लाच घेताना त्यांना रंगेहात पकडलं होतं. त्यानंतर बागुल यांच्या तीन घरं असलेल्या ठिकाणी छापे मारण्यात आले. या छाप्यामध्ये मोठं घबाडं हाती लागलं आहे.
दिनेशकुमार बागुल यांना अटक केल्यानंतर त्यांच्या नाशिक, पुणे आणि धुळ्यातील घरावर छापे मारण्यात आले. या छाप्यामध्ये एकूण 1 कोटी 44 लाख रूपयांची रोख रक्कम सापडली. यामध्ये 98 लाख 63 हजार ही सर्वाधिक रक्कम नाशिकमधील घरामध्ये सापडली. पुण्यातील घरी 45 लाख 40 हजार रूपये सापडले असून आता इतर घरे आणि लॉकरची मोजमाप अद्यापही बाकी आहे.
एका कार्यकारी अभियंत्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आली कशी?, अजुन इतर ठिकाणीही अशा प्रकारची काही गलेलठ्ठ रक्कम आहे का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. बागूलनं रोकड,सोन,बेनामी संपत्ती अशी कोट्यवधी रुपयांची माया जमवल्याचा संशय लाचलुचपत विभागाला आहे.
दरम्यान, या छाप्यामध्ये सापडलेल्या घबाडामुळे दिनेश बागुलशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारीही लाचलुचपत विभागाच्या रडारवर आले आहेत.