Maghi Ganesh Jayanti 2023 : माघी गणेश जयंतीच्या निमित्तानं राज्यातील अनेक गणपती मंदिरांमध्ये आणि काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. माघ गणेशोत्सवाच्या निमित्तानं बुधवारी (Ganesh Jayanti) अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे. ज्यामुळं दैनंदिन वाहतुकीच्या मार्गांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. (Pune Maghi Ganesh Jayanti Miravnuk) पुण्यामध्ये माघी गणेश जयंतीची विशेष धूम. त्यामुळं या भागात अनेक मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यातील शिवाजी मार्गावर असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर येथे भक्तांची पहाटेपासूनच रिघ पाहायला मिळत आहे. त्यामुळं या मार्गावर सकाळी 6 वाजल्यापासून वाहतुक बंद असेल. सदर परिसरातील गर्दी कमी होत नाही, तोवर हे आदेश लागू असतील. ज्यामुळं या वाटेनं जाणाऱ्यांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
सदर मार्गावर वाहतूक बंद असली तरीही अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस वाहनं, रुग्णवाहिका आणि काही अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या मार्गावरून प्रवास करता येणार आहे.
पुण्यात नेमकी कशी असेल वाहतूक व्यवस्था?
पुण्यातील स. गो. बर्वे चौकातून शिवाजी रोडने स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व प्रकारची जड वाहतूक (पीएमपीएमएल बस वगळता) बंदी असेल. तर, प्रीमियर गॅरेज चौक ते मंगला सिनेमागृहासमोर तूर्तास नो-पार्किंग, नो-हॉल्टींग लागू करण्यात आलं आहे.
पुण्यात बसनं प्रवास करताय? हे लक्षात ठेवा
माघी गणेश जयंती निमित्तानं या कालावधीत पीएमपीएमएल बसेससाठी प्रीमियर गॅरेज चौक, मंगला सिनेमागृहासमोरुन खुडे चौक, पुणे मनपा कोर्ट कॉर्नर, प्रीमियर गॅरेज चौक असा वर्तुळाकार बस मार्ग राहील. स. गो. बर्वे चौकातून छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्गाने स्वारगेटकडे जाणाऱ्या बस प्रीमियर गॅरेज चौकातून मंगला सिनेमागृहासमोरुन उजवीकडे वळून खुडे चौक, बालगंधर्व चौक, खंडोजीबाबा चौक, अलका टॉकीज चौक, टिळक रोडने पुरम चौक मार्गे मार्गस्थ होतील. तर, पुणे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बस बाजीराव रोडने गाडगीळ पुतळा चौकावरून कुंभार वेस चौक मार्गे पुणे स्थानकाच्या दिशेनं जातील.
स. गो. बर्वे चौकातून र्गाने पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या बसेस प्रीमियर गॅरेज चौकातून मंगला थिएटर समोरुन पुढे राष्ट्रवादी काँग्रेस भवन उजवीकडे वळून कुंभारवेस चौक, शाहिर अमर शेख चौक मार्गे जातील.
खासगी वाहनांसाठी कोणते नियम?
दोन आणि चारचाकी (खासगी वाहनं) वाहनांसाठी स. गो. बर्वे चौकातून सरळ जंगली महाराज मार्गाने बालगंधर्व चौकातून वाट देण्यात आली आहे. यावेळी जिजामाता चौकातून छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्गाने स्वारगेटकडे जाण्यासाठी मात्र पर्आयी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाच्या दिशेनं जाणारी सर्व वाहतूक पर्यायी मार्गातून वळवण्यात आली आहे. त्यामुळं अप्पा बळवंत चौकातून ही वाहनं पुढे बाजीराव रोडने इच्छितस्थळी जातील.
सायंकाळच्या वेळी इथं मानाच्या गणपतींच्या मिरवणुका सुरु झाल्यानंतर वाहतूक गरजेनुसार पर्यायी मार्गांच्या दिशेनं वळवण्यात येणार आहे. त्यामुळं अलका टॉकीज, खंडोजीबाबा चौक या मार्गांवर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावू शकते. मानाच्या गणपतींच्या मिरवणुकांसाठीचा परिसर आणि त्या भागातील अंतर्गत वाहतुकही गरजेनुसार बदलली जाऊ शकते.
मुंबईतही प्रभादेवी येथे असणाऱ्या श्री सिद्धीविनायक गणपती मंदिरात येणाऱ्या भक्तांची गर्दी लक्षात घेता इथंही वाहतुकीत काही बदल करण्यात येतील. ज्यामुळं दादर, प्रभावेदी स्थानकांच्या दिशेनं जाणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. तर, सिद्धीविनायकच्या दिशेनं येणारी वाहतूकही धीम्या गतीनं सुरु असेल. सायंकाळी सदर परिसरात मिरवणूक निघणार असल्यामुळं वाहतुक एकाच मार्गिकेवरून सुरु ठेवली जाऊ शकते.