Pune's Water Crisis: राज्यात उष्णतेच्या झळांनी हैराण झालेल्या नागरिकांसमोर पाणी टंचाईचा प्रश्नही आ वासून उभा ठाकला आहे. पुण्यात धरणातील पाणीसाठा तळ गाठतो आहे. त्यामुळं मे-जुनमध्ये तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पालिकेकडून काही नियम जारी करण्यात आले आहेत.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी प्रमुख असलेल्या खडकवासला धरणातील पाणीसाठाही झपाट्याने कमी होत आहे. सध्या खडकवासला धरणात दीड महिना पुरेल इतकांच पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या उपलब्ध साठा 9.43 टीएमसी इतका आहे. त्यामुळे पिण्यासाठी ६ टीएमसी पाणी उपलब्ध असणार आहे. मे, जूनमध्ये पुणेकरांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने पुणेकरांना भविष्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळं पालिकेने पाण्याचे नियोजन करुन बचत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, मागील वर्षी कमी पाऊस पडल्याने आणि यंदा भीषण उकाडा यामुळं धरणांमध्ये कमी पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातील शेतीसाठीचे एक आवर्तन आहे. त्यामुळं पिण्याचे पाणी फक्त 6 टीएमसी इतके आहे.
दरम्यान, खडकवासलाबरोबरच उजनी धरणाच्या पाणीपातळीतही घट झाली आहे. त्यामुळं पुणे, इंदापूर तालुक्याच्या काही भागातील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. भीमा नदीपात्रही कोरडे ठाक पडले आहे. त्यामुळं शेतकरीदेखील चिंतातुर झाला आहे. भीमा नदीच्या पाम्याने तळ गाठल्याने एप्रिल, मे महिन्यात प्रचंड पाणीटंचाई जाणवणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
परंपरिक दुष्काळी सांगोला तालुक्यात ऐन उन्हाळ्यात माण नदी पाणी भरून वाहू लागल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नसल्याचे चित्र आहे. पावसाळ्यातही माण नदी अनेकदा कोरडी राहिली आहे. मात्र आज पर्यंतच्या काळात पहिल्यांदाच टेंभू योजनेतून कृष्णेचे पाणी 500 क्युसेकने माण नदीत सोडल्याने पिण्याच्या पाण्यासह शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.