विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल सुनावताना एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निकाल देत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला होता. यानंतर अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत दाद मागितली आहे. तर दुसरीकडे मंगळवारी मुंबईत महापत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून, यावेळी निर्णयातील त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान या सर्व घडामोडी आणि आरोपांवर राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
"काही नागरिक सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात जात असतील तर तो त्यांचा हक्क आहे. पण फक्त याचिका दाखल केली म्हणजे मी दिलेला निर्णय अयोग्य ठरत नाही. मी दिलेल्या निर्णय अयोग्य ठरवण्यासाठी त्यात नियमबाह्य, घटनाबाह्य किंवा बेकायदेशीर काही असेल तर ते दाखवून द्यावं लागेल. त्यानंतर तो निर्णय रद्द होऊ शकतो," असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.
दरम्यान उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून निवड झाली तेव्हा राहुल नार्वेकर पक्षात होते हे सांगताना त्यांचे फोटो, व्हिडीओ ठाकरे गटाच्या नेत्यांकडून दाखवले जात आहेत. त्यावर ते म्हणाले की, "2018 मध्ये जे घटनेत बदल केले ती ग्राह्य धरावी की 1999 मध्ये निवडणूक आयोगाकडे दिली ती ग्राह्य धरावी हा प्रश्न आहे. माझे फोटो आणि व्हिडीओ दाखवण्यापेक्षा जर त्यांनी घटना दुरुस्ती केली असती तर हा प्रसंग आला नसता".
पुढे ते म्हणाले की, "अरविंद सावंत 2018 चं पत्र दाखवत आहेत. ते माझ्याकडे सुनावणीदरम्यान रेकॉर्डवर होतं. त्या पत्रात संविधानाबाद्दल एकही शब्द नाही. ते पत्र केवळ शिवसेनेच्या संघटनात्मक निवडणुका होऊन त्याचे निकाल निवडणूक आयोगाला कळवले होते. संविधानात बदल केल्याचा कोणताही उल्लेख त्यात नाही".
ठाकरे गटाच्या महापत्रकार परिषदेबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, "पत्रकार परिषद घेत असतील तर हा त्यांचा विषय आहे. पण त्याने काही तथ्य बदलणार नाही. मी दिलेल्या निर्णयातील त्रुटी दाखवा, त्यानंतर पुढे बोलता येईल. पण निर्णयातील कोणतीही बाब चुकीची नाही असं सांगत फक्त टीका करणार असतील तर राज्यातील जनता सुज्ञ आहे".