प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : कोकण रेल्वे (Kokan Railway) फाटकावरील गेटमन चंद्रकांत कांबळे यांच्या खुनाचा उलगडा करण्यात रायगड पोलिसांना (Raigad Police) यश आलंय. चंद्रकांत कांबळे यांचा खून त्यांचा सख्खा मेहुणा विजय शेट्टी यानेच केल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. मालमत्तेच्या वादातून हा खून केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. फरार विजय शेट्टीचा रायगड पोलीस शोध घेत आहेत.
चंद्रकांत कांबळे हे तिसे रेल्वे फाटक इथे 21 ऑगस्ट रोजी कर्तव्यावर असताना भरदिवसा त्यांच्या डोक्यात गोळी झाडून त्याचा खून करण्यात आला होता. विजय शेट्टी यांचे रोहा तालुक्यातील खैरवाडी येथील सामायिक घर विकण्यावरुन दोघांमध्ये वाद होता. याच वादातून चंद्रकांत याचा खून झाल्याचे पोलिसांचे म्हणणे असून तसे पुरावे सापडल्याचा दावा त्यांनी केलाय. स्थानिक गुन्हे शाखेची चार पथके विजय शेट्टी याच्या मागावर आहेत.
21 ऑगस्ट रोजी कोलाडजवळील तिसे येथील रेल्वे फाटकाजवळ चंद्रकांत कांबळे यांची हत्या करण्यात आली होती. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. चंद्रकांत कांबळे जवळच असलेल्या महाबळे गावचे रहिवासी होते. गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाला होता. भरदिवसा कांबळे यांची हत्या झाल्याने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते. जोपर्यंत मारेकऱ्याला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी काय सांगितले?
"21 ऑगस्ट रोजी चंद्रकांत कांबळे यांचा कोलाड येथे गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. रेल्वे गेटमन म्हणून ते काम करत होते. या प्रकरणाचा खुलासा करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. या गुन्ह्यामध्ये कांबळे यांच्या बहिणाचा पती विजय शेट्टी हा आरोपी आहे. दोघांचेही घराच्या पैशावरुन वाद होते. त्यामुळेच ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आरोपीला अटक झालेली नाही. आरोपीला अटक करण्यासाठी चार पथके तैनात करण्यात आली आहे. आरोपीने गुन्ह्यात वापरलेली मोटारसाईकल जप्त करण्यात आली आहे. आरोपीच्या घरातून काही महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत. लवकरच आम्ही आरोपीला अटक करु," अशी माहिती अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दिली.