प्रफुल्ल पवार / अलिबाग : बनावट सोने (Fake gold) देणाऱ्या टोळीला पोलिसांनी (Raigad police )अटक केली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. सोन्याचे शिक्के देतो असे सांगून चक्क पितळेचे शिक्के देवून गंडा घालणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे. यात चार आरोपींना पोलीसानी बेडया ठोकल्या असून त्यात एका महिलेचाही समावेश आहे. त्यांच्याकडून 65 लाखांची रोकड आणि 3 लाख रुपये किंमतीची कार जप्त करण्यात आली आहे.
प्रभूभाई गुलशनभाई सोलंकी उर्फ कल्पेश प्रजापती , मणीलाल नारायण राठोड तथा महेश प्रजापती, अर्जुन भिकाभाई सोलंकी, आणि लक्ष्मीदेवी शंकर गुजराती अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून फसवणूक करून लुटलेली 65 लाखांची रोकड आणि 3 लाख रुपये किंमतीची कार असा 68 लाखाचा मुददेमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी दिली.
मांडवा सागरी पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी सोन्याचे बनावट शिक्के देऊन तब्बल 65 लाखांची फसवणूक झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे येथील फिर्यादी हा मुंबई- मांडवा रो रो बोट सेवेने प्रवास करीत असताना दोन अनोळखी पुरुष आणि एक महिला त्यांच्या संपर्कात आले होते. खोदकाम करताना आपल्याला सोन्याचे शिक्के सापडले असून पैशाची खूप गरज असल्याने ते शिक्के विकायचे आहेत असे या तिघांनी फिर्यादीला सांगितले. फिर्यादीने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कमी किमतीत सोन्याचे शिक्के मिळत असल्याने ते शिक्के त्यांच्याकडून 65 लाखाला खरेदी केले.
परंतु आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. सोन्याचे शिक्के म्हणून हातात पितळेच्या धातूचे शिक्के ठेवल्याचे समजल्यानंतर फिर्यादीने तात्काळ मांडवा पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सुपूर्द केला. गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी एक तपास पथक तयार करुन गुन्ह्यातील आरोपी, आणि टोळ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
दरम्यान पोलीस हवालदार अमोल हंबीर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर तपासाची सूत्रे हलली. मिळालेल्या माहितीनुसार असे गुन्हे करणारे आरोपी हे गुजरात राज्यातील वडोदरा ,वलसाड भागात असल्याचे समजले. पोलीस पथकाने गुजरात गाठले. वडोदरा वलसाड येथे 10 दिवस राहून आरोपींची माहिती घेतली आणि चकवा देणाऱ्या आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली.
यातील प्रभूभाई सोळंकी तथा कल्पेश प्रजापती (37) ,मणीलाल राठोड उर्फ महेश प्रजापती (52) आणि अर्जुन सोलंकी (25) यांना गुजरात मधून 12 एप्रिल रोजी तर लक्ष्मीदेवी गुजराती (45) हिला 13 एप्रिल रोजी ठाणे जिल्हयातील खडवली पडघा येथून ताब्यात घेतले. त्यांच्या कडून मुद्देमाल हस्तगत केला असून 22 एप्रिल पर्यंत त्याना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून अशा प्रकारचे गुन्हे त्यांनी मुंबई, नाशिक, वर्धा, नागपूर, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान येथे केल्याचे तपासात समोर आले आहे.
आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत . ते अशाप्रकारे 8 ते 10 जणांना गाठतात . त्यांच्याशी ओळख वाढवतात . आम्ही मजूर आहोत आम्हाला खोदकामात सोने सापडले आहे . ते कमी पैशात विकायचे आहे असे सांगून लोकांना आमीष दाखवतात . या आमिषाला भुलून त्यातील एखादा त्यांच्या गळाला लागतो आणि त्यांची फसवणूक होते . अशाप्रकारे कुणी आपल्याला सोने विकायचे आहे असे सांगत असेल तर त्याला बळी न पडता थेट पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन रायगडचे पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी केले आहे.