रोह्यात एका सर्वसामान्य कुटुंबातील 24 वर्षीय तरुणाला बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाकडे एक दोन नव्हे तब्बल नऊ प्रकारची 113 हत्यारे आढळून आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तरुणाने ही सगळी हत्यारे तयार केली आहेत.
सोमवारी 8 जानेवारी रोजी सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली. रोहा शहरातील धनगर आळीत अलिबाग गुन्हे अन्वेषण शाखेने सोमवारी रात्री बेकायदा शस्त्रसाठ्याचा साठा पकडला. यावर मंगळवारी जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती दिली. या प्रकरणात 24 वर्षीय तरुणाला अटक केले आहे. रात्री 10 वाजता या प्रकरणात धाड टाकण्यात आली. यामध्ये बेकायदेशीर शस्त्रसाठी बाळगली असल्याच पोलिसांची निदर्शनास आहे.
चार बारा बोर बंदूक, एक देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर, पाच धारदार चाकू, दोन धारदार तलवारी, सहा कोयते, 90 जिवंत काडतुसे, पाच रिकामी काडतुसे, बंदूक सापडली. तसेच काडतुसे बनवण्याचे साहित्य, हरीण व इतर प्राण्यांच्या 22 शिंगांच्या जोड्या जप्त केल्या. याची किंमत 1 लाख 66 हजार 650 रुपये आहे.
तन्मय सतीश भोगटे असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण रोह्यामधील धनगरआळी येथील रहिवासी आहे. त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्याची आई शिवणकाम करीत असून, त्याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून तो बंदूक, काडतूस तयार करणे, विकणे असा बेकायदेशीर धंदा करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घरात मिळालेले साहित्य ते शिकारीसाठी वापरणारे असले तरी शस्त्रसाठा घरात ठेवणे घातकच होते. यामुळे कोणताही चुकीचा प्रकार घडू शकतो. त्यामुळे या प्रकरणात तरुणाला अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री छापा टाकून शस्त्रसाठा जप्त केला आहे. या गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आणखी काही जणांचा समावेश असल्याची शक्यता आहे. त्याचा शोध सुरू असून त्याची सखोल चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक, रायगड यांनी दिली आहे.