पावसाने पाणी घरात, कात्रजमधील परिस्थितीला पालिका जबाबदार - सुप्रिया सुळे

पुणे शहरात रात्रीपासून तुफान पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचा घरात पाणी शिरले आहे.   

Updated: Oct 15, 2020, 12:55 PM IST
पावसाने पाणी घरात, कात्रजमधील परिस्थितीला पालिका जबाबदार - सुप्रिया सुळे  title=

पुणे : शहरात रात्रीपासून तुफान पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचा घरात पाणी शिरले आहे. तर कात्रज येथील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. मुसळधार पावसामुळे येथील स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. कात्रज परिसराला आज खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली आणि पाहणी केली. कात्रजमधील परिस्थितीला पालिका जबाबदार आहे, असे थेट आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. पुणे पालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येणार याची उत्सुकता आहे.

सुप्रिया सुळे यांनी काल पुण्यात झालेल्या पावसाचा तसेच तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांची काय परिस्थिती आहे, याची पाहणी केली. तसेच कात्रज येथील प्राणी संग्राहालयातही केली पाहणी. 

कात्रज परिसरात पुरामुळे  उद्भवलेल्या परिस्थितीला पुणे महापालिका जबाबदार असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. कात्रज नाल्याच्या भोवतीच्या संरक्षक भिंत दोन वर्षांपूर्वी पुरामध्ये वाहून गेल्यानंतर अजूनही भिंत बांधण्यात आलेली नाही. वारंवार स्थानिक नगरसेवकांनी पाठपुरावा करूनही पुणे महापालिकेकडून निधी दिला जात नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

पुणे महापालिका काही करत नसल्यामुळे आता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे या संदर्भामध्ये दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे महापालिकेचा पालिकेचा भोंगळ कारभार आहे. पालकमंत्र्यांना भेटणार आणि मार्गदर्शन करा असे सांगणार आहोत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.