ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 18 नोव्हेंबरला ठाण्यात होणाऱ्या सभेच्या जागेवरुन वाद सुरु आहे. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात सभा घेण्यासाठी मनसे प्रयत्नशील आहे.
मात्र या परिसरातील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील अशोक टॉकीज परिसर किंवा तलावपाळी मार्गावर सभेचे आयोजन घेण्यासाठी मनसेने पोलिसांकडे परवानगी मागितलीय.
याशिवाय सेंट्रल मैदानाचाही मनसेकडून विचार सुरु आहे. मात्र ते शांतता क्षेत्र असल्यामुळे स्टेशन परिसरातच सभा घेण्यावर मनसे ठाम आहे. रहदारीचा रस्ता, शासकीय कार्यालय जवळ असल्यामुळे स्टेशन रोडवर सभेच्या आयोजनाबाबत पोलीस अनुकूल नाहीत.
याआधी एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी मनसेने 5 ऑक्टोबरला काढलेल्या मोर्चालाही पोलिसांनी परवानगी नाकारली होती.
आता ठाण्यातल्या राज ठाकरेंच्या सभेकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यावर सुरू असलेल्या पोलीस कारवाईवर जाब विचारण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आलीय.