दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातला एक मोठा शासकीय भरती घोटाळा समोर आलाय. पदामागे 15 ते 25 लाख रुपये घेऊन सरकारी नोकरी मिळवून देणारं हे रॅकेट 2009 पासून कार्यरत आहे. योगेश जाधव या एका धाडसी तरुणामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि आतापर्यंत काही जणांना अटक झालीय. मात्र, आत्तापर्यंतची कारवाई म्हणजे केवळ हिमनगाचं टोक असल्याचंच चित्र आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या किनवट गावातला योगेश जाधव हा तरूण यूपीएससी परीक्षेची तयारी करतोय. आपल्या गावातल्या 30-35 मुलांनी पैसे भरून सरकारी नोकरी मिळवल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी हा विषय धसास लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, हे काम सोपं नव्हतं. यासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते अनेक वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांचे उंबरठे त्यांनी झिजवले. तक्रारींचे तब्बल आडीच हजार ईमेल योगशनी केलेत. या चिकाटीला आणि पाठपुराव्याला आता काही प्रमाणात यश आलंय. या भरती घोटाळा प्रकरणी आत्तापर्यंत हे रॅकेट चालवणाऱ्या मुख्य सूत्रधारासह सात जणांना अटक झालीय.
2009 पासून राज्याच्या शासकीय सेवेतल्या विविध पदांवर भरती करण्यासाठी हे रॅकेट सुरू होतं... पदानुसार 15 ते 25 लाख रुपये देऊन अनेक जण शासकीय सेवेत भरती झालेत. कृषी विस्तार अधिकारी, महिला बालविकास अधिकारी, वसतीगृह अधिक्षक, वरिष्ठ कारकून, सहाय्यक अभियंता, पोलीस निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी अशा विविध पदांसाठी या रॅकेटद्वारे भरती झालीय.
मूळ उमेदवाराच्या जागी डमी विद्यार्थी बसवून ही भरती प्रक्रिया पार पाडली जायची. घोटाळ्याचा सूत्रधार प्रबोध उर्फ प्रमोद राठोड हा स्वतः परभणी जिल्हा परिषदेत कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी असल्याचं समोर आलंय. योगेश यांच्या गावातल्या मुलांनी जमिनी विकून आणि घरं गहाण ठेवून त्याला पैसे दिलेत. धक्कादायक बाब म्हणजे, काही डमी उमेदवारांना पैशांबरोबरच मुलीही पुरवण्यात आल्याचं समोर आलंय.
योगेश जाधवांनी सप्टेंबर 2015 रोजी भरती घोटाळ्या प्रकरणी पहिली तक्रार केली. त्यानंतर 9 महिन्यांनी, 27 जून 2016 रोजी पहिला गुन्हा दाखल झाला. या प्रकरण्याच्या तपास अधिकाऱ्यानं काही पुरावे बदलल्याचंही समोर आलंय. याप्रकरणी कोर्टानं फटकारल्यानंतर 21 मार्च 2017 रोजी या घोटाळ्याचा तपास एसआयटीकडे देण्यात आला आणि अटकसत्र सुरू झालं.
- 23 मे रोजी मुख्य सूत्रधार प्रबोध उर्फ प्रमोद राठोडला अटक झाली
- परभणी कृषी विद्यापीठातील कक्षअधिकारी अरविंद टाकळकर यानं 10 लोकांसाठी डमी म्हणून परीक्षा दिली होती
- आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांचा सहाय्यक भगवान झंपलवार
- औरंगाबादचा हस्तलिखित तज्ज्ञ योगेश पंचवटकर
- सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पारवे
- 15 लोकांसाठी डमी राहिलेला लातूरच्या कोचिंग क्लासचा संचालक बालाजी भातलोंढे
- पुण्याच्या समाजकल्याण आयुक्तालयातला कारकून सचिन त्रिमनवार यांना आतापर्यंत अटक झालीय.
- तर आर्थिक गुन्हे शाखेतला दिनेश सोनसरक हा आरोपी फरार आहे.
चार आरोपींविरोधात चार्जशीट दाखल झालंय. आतापर्यंतच्या तपासात जवळपास 200 जण आरोपी असल्याचा संशय आहे. यात शासकीय सेवेत कार्यरत असलेले अनेक वरिष्ठ अधिकारीही आहेत.योगेशच्या दाव्यानुसार यात हजारहून अधिक जण गुंतले आहेत. आत्तापर्यंत अटक झालेले सर्व जण हे कनिष्ठ अधिकारी आहेत. मात्र, या भरती घोटाळ्याद्वारे भरती होऊन आज वरिष्ठ पदावर पोहचलेल्या अनेक अधिकाऱ्यांवर याप्रकरणी कारवाई होणार का? हा खरा प्रश्न आहे.