कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या डी.वाय.पाटील रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे, संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली. त्यानंतर रुग्णालयातल्या निवासी डॉक्टर्सनी संप पुकारला. पण या संपामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.
डी वाय पाटील रुग्णालयातल्या निवासी डॉक्टर्स दोषींवर कारवाईसाठी घोषणा देतायत. रुग्णालयात काल रात्री 26 वर्षीय केतन गायकवाडचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्युला डॉक्टरचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत डॉक्टरला मारहाण केली. या मारहाणीत डॉक्टरचा जीवही जाऊ शकला असता असा आरोप निवासी डॉक्टर्सनी केलाय. मारहाण करणाऱ्यांना अटक करा अशी मागणी करत सर्व निवासी डॉक्टर संपावर गेले.
निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे रुग्णांचे मात्र चांगलेच हाल झाले.
रुग्ण दगावला की डॉक्टर्स ना मारहाण होण्याचे प्रकार सातत्यानं पाहायला मिळतायत. ते समर्थनीय नक्कीच नाही, पण त्यानंतर संप हा सुद्धा काही उपाय नाही. मुळात गंभीर स्वरूपात परिस्थिती हाताळण्याचे तारतम्य डॉक्टर्सनीही दाखवणं गरजेचं आहे. नाहीतर असे प्रकार रोखणं त्रासदायक ठरणार आहे.