ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी जिल्हा यंत्रणा सज्ज झाली असून यंदा प्रत्येक विधानसभा मतदार संघात पाच व्हीव्हीपॅट यंत्रातील मतपावत्यांची पडताळणी केली जाणार असल्याने अंतिम निकाल लागण्यासाठी किमान १२ ते १५ तास लागण्याची शक्यता असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ठाणे लोकसभा मतदार संघातील एकुण २३ लाख ७० हजार २७३ मतदारांपैकी ११ लाख ६७ हजार २६५ जणांनी मतदान केले. मतदानाचे हे प्रमाण ४९.२५ इतके आहे. या मतदार संघातून एकुण ५ हजार २८३ टपाल मतपत्रिका वितरीत करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३ हजार २२३ मतदान पत्रिका जिल्हा प्रशासनाकडे आल्या आहेत. मतमोजणी सुरू होण्याच्या अगदी एक मिनिट आधीपर्यंत टपालाने येणाऱ्या मतपत्रिका ग्राह्य धरल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील ६३० मतदार लष्करात अधिकारी, सैनिक म्हणून कार्यरत आहेत. त्यापैकी २३२ जणांनी इलेक्टॉनिकली ट्रान्सफर्ड बॅलेडपेपरद्वारे मतदानाचा हक्क बजावला आहे.
ठाणे लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ असून प्रत्येकी १४ टेबलांवर त्या त्या विधानसभा मतदार संघातील मतमोजणी होणार आहे. किमान २७ ते कमाल ३३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल. प्रत्येक विधानसभा मतदार संघात पाच व्हीव्हीपॅट मोजायचे आहेत. प्रत्येक व्हीव्हीपॅट मोजायला किमान एक तास लागणार असल्याने यंदा निवडणुकाचा निकाल लागायला किमान १२ ते १५ तास लागणार आहे. सकाळी अकरा वाजता पहिल्या फेरीची आकडेवारी उपलब्ध होईल.
मतमोजणीसाठी तब्बल ८०० कर्मचारी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ७०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून वैद्याकीय मदत केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होईल. तर प्रत्येक विधासभेला एक रंग दिला गेला आहे, त्यावरून कळते की कोणती विधानसभेचे कुठे काम सुरु आहे.