मुंबई : काही दिवसांपूर्वी महाडमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलं होतं. या मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती निर्माण केली होती. यानंतर इथल्या नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तर महाडच्या नागरिकांसमोर साथरोगाचं संकट उभं असलेलं दिसतंय. पूरानंतर इथल्या नागरिकांमध्ये लेप्टोची लागण झाली होती. त्यानंतर आता रूग्णसंख्येत वाढ झाल्याचं समोर येतंय.
मुसळधार पावसाने आलेल्या पूरानंतर गेल्या आठवड्यात 15 जणांना लेप्टोस्पायरोसिसची लागण झाली होती. तर आता या रूग्णसंख्येत वाढ झाली असून ही संख्या 29 वर जाऊन पोहोचलीये. तर गेल्या आठवड्यात 3 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. या सर्व परिस्थितीमुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांनी तातडीने आरोग्य तपासणी करून घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलं होतं.
21 ते 23 जुलै या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड आणि पोलादपूर परिसराला महापूराचा तडाखा बसला. पूरानंतर महाड परिसरात चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले होते. चिखलाचा एक ते दीड फूटांचा थर जमा झाला होता. धान्य कुजल्यामुळे दुर्गंधीही पसरली होती. पूरामुळे शेकडो जनावरेही मृत होऊन पडली होती. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात होती.
सांगली, कोल्हापूरपासून कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील पूरग्रस्त भागात साथीचे आजार तसेच कोरोना वाढू नये यासाठी आरोग्य विभागाचे डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करतायत. तरीदेखील पूरग्रस्त कोकणात लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळण्याची भीती आरोग्य विभागाच्या डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येतेय. एकट्या महाड तालुक्यात लेप्टोस्पायरोसिसचे 59 संशयित रुग्ण आढळून आलेत. एलायझा चाचणीत त्यापैकी 29 जणांना लेप्टोस्पायरोसिस झाल्याचे स्पष्ट झालंय...
सध्या आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून जिल्हा प्रशासनाने आरोग्य तपासणीसाठी नागरिकांनी पुढे येण्याचं आवाहनंही केलंय. त्याचप्रमाणे यापूर्वी सर्व प्रकारची औषधं महाड आणि पोलादपूर रुग्णालयांना उपलब्ध करून दिलीयेत. दरम्यान जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या म्हणण्याप्रमाणे, नागरीकांनी निःसंकोचपणे आरोग्य तपासणीसाठी समोर यावं. रूग्णांनी गृहविलगीकरणातच उपचार केले जातील. सर्व प्रकारची औषधे घरीच उपलब्ध करून दिली जातील