मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून अजित पवार यांच्यावर शेलक्या भाषेत करण्यात आलेल्या टीकेनंतर दोन्ही पक्षांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. या वादात आता शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी उडी घेतली आहे.
रोहित पवार हे शरद पवार यांचे पुतणे राजेंद्र पवार यांचे पूत्र आहेत. ते सध्या बारामती जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत.
रोहित पवार यांनी रविवारी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. बाळासाहेब अखेरच्या क्षणी म्हणाले होते, आमच्या उद्धवला सांभाळा. 'सामना'तील अग्रलेख वाचून त्या सांभाळाचा खरा अर्थ समजला, असा उपरोधिक टोला रोहित पवार यांनी लगावला.
बाळासाहेब हुशार होते, भाषेवर प्रभुत्व असणारे मोठ्ठे नेते होते. मार्मिक असो कि सामना त्यांनी टीका देखील जहाल केली, पण त्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी गरळ ओकून त्यांच्याच लेखणीचा अपमान केला, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
याशिवाय, शिवसेनेच्या मंत्र्यांकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या राजीनाम्याच्या धमकीवरूनही त्यांनी उद्धव यांना लक्ष्य केले. उद्धव ठाकरे कधी लोकांच्यातून निवडून आले नाहीत की मातोश्रीच्या बाहेर पडून उभा महाराष्ट्र पाहण्याचं देखील साधं कष्ट घेतलं नाही. महाराष्ट्र जळत असताना हे महाशय सत्तेत भागीदार होवून सर्वसामान्यांना भुलवण्याचं काम करत आहेत. इतका लेख लिहण्याच्या ऐवजी दोन ओळींचा राजीनामा दिला असता तरी आपल्या वडिलांप्रमाणे आपला ताठ कणा महाराष्ट्राला पहायला मिळाला असता, अशी टीका रोहित पवार यांनी केली.
त्यामुळे आता शिवसेना या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.