Tigress calf Name Politics: राज्याचे राजकारण प्रचंड वेगाने बदलत असल्याचे आपण पाहत आहोत. त्यामुळे राजकारणा कोणत्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. असाच एक प्रकार संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला. वाघिणीच्या बछड्याचे नाव आदित्य ठेवण्यावरुन राज्याचे राजकारण तापलेले दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील वाघिणीने पिल्लांना जन्म दिल्यानंतर राजकारण सुरु झाले आहे. वाघिणीच्या पिल्लांचा नामकरण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी बछड्यांच्या नावासाठी वेगवेगळ्या चिठ्ठ्या ठेवण्यात आल्या होत्या. यातील एक चिठ्ठी उचलण्यात आली. ज्या चिठ्ठीतून आदित्य नाव समोर आले. त्यानंतर पुढे काय झाले? हे सविस्तर जाणून घेऊया.
7 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातून एक आनंदाची बातमी समोर आली. यावेळी पांढरी वाघीण अर्पिताने पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला होता. या बछड्याच्या नामकरणावरून राजकारण होईल असे कोणाला अपेक्षित नव्हते. पण आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज मुख्यमंत्री सिद्धार्थ उद्यानात झेंडावंदनाला आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थित नामकरण सोहळा सुरु होता. यावेळी चिठ्ठीतून आदित्य नाव आले, तशी घोषणाही करण्यात आली. पण सुधीर मुनगंटीवारांनी बछड्याला आदित्य नाव देण्यास विरोध केला.
त्यावेळी सिद्धार्थ उद्यानात नुकत्याच जन्मलेल्या तीन वाघांच्या बछड्यांची नावे श्रावणी, कान्हा आणि विक्रम अशी ठेवली. यावेळी आदित्य नावाच्या चिठ्ठीची सर्वात जास्त चर्चा झाली. कारण मुनगंटीवारांनी आदित्य नावाची चिठ्ठी बाजूला ठेवण्यास सांगितलं. यानंतर आदित्यऐवजी कान्हा हे नाव ठेवण्यात आले. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला मात्र या प्रकरणावरुन अंबादास दानवेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलीय.
मुनगंटीवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जंगलातील वाघांच्या बछड्यांचे नामकरण होत नाही. केवळ उद्यानामध्ये जन्मलेल्या वाघांना नाव दिले जातात. पण कोणतेही नाव देताना कोणतेही वाद निर्माण होऊ नयेत याची काळजी घ्यायला हवी, असे ते म्हणाले.
वाघिणीच्या बछड्याचे नामकरण वरून विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारला टोला लगावला.. कधीही कोणताही आदित्य लपू शकत नाही, तो पृथ्वीतलावरचा असेल किंवा पृथ्वीतलावरचा नसेल. जमिनीवरदेखील एक आदित्य आहे. तिरस्कार करा मात्र आदित्य जास्त तळपत राहील.अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिली.