सांगली : अनिकेत कोथळेचा मृत्यू जबर मारहानीमुळेच झाल्याचं वैद्यकीय अहवालात स्पष्ट झालंय.
अनिकेतच्या छातीवर आणि पोटात एखाद्या जड अवजारानं जबर मारहाण झाली. मारहाण झाल्यानंतर फुफ्फुस आणि किडनीमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे अनिकेतचा मृत्यू झाल्याचं या अहवालात म्हटलंय. हा अहवाल सीआयडीकडे सूपुर्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबर २०१७ रोजी लुटमारीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळे व अमोल भंडारला अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला नग्न करुन उलटा टांगून बेदम मारहाण केली. यामध्ये अनिकेतचा मृत्यू झाला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली येथे जाळला होता. याप्रकरणी बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहूल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला, झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले व कामटेचा नातेवाईक बाबासाहेब कांबळे या सातजणांना अटक केली होती.
सध्या हे सर्वजण कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्यादिवशी ७ नोव्हेंबरला त्याचा मृतदेह जाळला होता. ८ नोव्हेंबर सांगली पोलिसांच्या पथकाने आंबोलीत घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी अनिकेतचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. सिंधुदुर्गचे जिल्हा न्यायाधीश व तहसील यांच्या उपस्थितीत पंचनामा करुन पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. विच्छेदन तपासणीसाठी मृतदेह मिरज शासकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला होता.
मृतदेह जळाला असल्याने विच्छेदन तपासणीला वेळ लागला. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाºयांकडून तब्बल दोन महिने तपासणी सुरु होती. तपासणीची ही प्रक्रिया दोन दिवसापूर्वी पूर्ण झाली. त्यानंतर सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक मुकूंद कुलकर्णी यांनी कोथळे कुटुंबाशी संपर्क साधून मृतदेह ताब्यात घेण्याची विनंती केली होती.