'माझा स्कूबा डायव्हिंगचा फोटो टाकून अश्लील...'; मुंडे भावा-बहिणींचा उल्लेख करत दामनियांचा आरोप

Anjali Damania Serious Allegations: अंजली दमानिया यांनी थेट मुंडे भावा-बहिणीचं नाव घेऊन गंभीर आरोप केले आहेत. नेमकं त्या काय म्हणाल्यात पाहूयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 5, 2025, 01:31 PM IST
'माझा स्कूबा डायव्हिंगचा फोटो टाकून अश्लील...'; मुंडे भावा-बहिणींचा उल्लेख करत दामनियांचा आरोप title=
मुंडेंचं नाव घेत गंभीर आरोप (फोटो सोशल मीडियावरुन साभार)

Anjali Damania Serious Allegations: बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आवाज उठवल्यामुळे समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्याला धमकीचे फोन येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते तसेच मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपाच्या नेत्या तसेच मंत्री पंकजा मुंडे यांचा उल्लेख करत दमानियांनी गंभीर आरोप केले आहेत. मुंडे भावा-बहिणींच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोप दामनिया यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला आहे. माऊली शिरसाट यांचे दमानिया यांना कॉल आल्याचं म्हटलं आहे. तसेच असे अनेक लोकांचे, कार्यकर्त्यांचे कॉल येत आहेत. मला धमकवण्यात येत आहे, असे त्यांनी पत्रकारांसमोर खुलासा करताना म्हटलं आहे.

मुंडेंकडून होतोय वंजारी समाजाचा वापर

"मी दोन विधानं केली होती. बीडमध्ये उच्च पदांवर वंजारी समाजाचे लोक आहेत असं बोलले होते. गोपानाथ मुंडेंच्या काळापासून हे होत आलं होतं. बीडमध्ये त्यांना बोलवण्यात आलं होतं. त्यात कोणत्याही प्रकारे जाती समाजाविरोधात बोलले नाही. ट्विटरवर स्पष्ट करण्यासाठी मी दोन मुद्दे टाकले," असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. "भगवान बाबा नेहमीच वंदनीय आणि आदरणीय आहेत. समाज कष्टाळू, आळशी आहे असं मी कुठेही म्हटलं नाही. समाजाला हा प्रकार चुकीच्या पद्धतीनं सांगण्याचे काम केले गेले. सानप मुंडेसारखे उच्च पदावरील माणसं परळीतच का? यासंदर्भात मी बोलले आणि ते लिहीलं देखील होतं आणि दाखवलं होतं. वंजारी समाजाचा वापर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडून होतोय यात शंका नाही," असंही अंजली दामनीया म्हणाल्या आहेत. 

पंकजांच्या पोस्टचा फोटो दाखवला

"शिक्षक भरतीसंदर्भात याचिका दाखल झाली होती. बिंदू नामावली निभावू असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी ट्विट करत त्याला स्थगिती दिली आणि हा फॅक्ट आहे," असं म्हणत अंजली दमानियांनी पंकजा मुंडेंच्या पोस्टचा फोटो पत्रकारांना दाखवला. "मी पेपरशिवाय बोलत नाही," असंही त्या पुढे म्हणाल्या.

स्कूबा डायव्हिंगचा फोटो टाकला आणि...

आपल्याला मुंडे समर्थकांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोपही दमानिया यांनी केला. "अख्खी फौज माझ्यामागे लावण्यात आली," असा आरोप करताना अंजली दमानियांनी काही नावं घेतली. माझा स्कूबा डायव्हिंगचा फोटो टाकला आणि त्यावर अश्लील, आक्षेपार्ह बोलले," असा आरोप अंजली दमानियांनी मुंडे समर्थकांवर केला. तसेच सुनिल फड या व्यक्तीचं नाव घेत त्याचा धनंजय मुंडेंबरोबर फोटो असल्याचं दमानिया यांनी पत्रकारांना दाखवलं. माझ्यासंदर्भात अत्यंत घाणेरड्या आणि अश्लील भाषेत माझ्याबद्दल लिहिलं गेलंय, अशा आरोप अंजली दमानियांनी केला आहे. 

नक्की वाचा >> 'मातोश्री'वरच्या बैठकीत बाचाबाची! ठाकरे संतापून 'या' नेत्याला म्हणाले, 'तुम्हाला जायचं असेल तर जा भाजपात'

या कार्यकर्त्यांची थेट नावं घेतली

"118 आमदारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. कोणी बोलायला लागलं तर असा मानसिक छळ करणार. मला त्रास देणारे सगळे पंकजा (मुंडे) आणि सुनील फड यांचे कार्यकर्ते आहेत. पंकजा मुंडे यांचा कार्यकर्ता असलेल्या संभाजी चौरेंनी पण कॉल केलाय. मोहन आघाव यांनी मला परत परत कॉल केलेत. या प्रत्येक माणसावर गुन्हा नोंदवला पाहिजे," अशी मागणी अंजली दमानियांनी केली आहे. 

रश्मी शुक्ला यांना मेसेज

"माझ्यासंदर्भात अश्लील भाषा वापरली. मानसिक छळ केला त्या सगळ्यांवर शासनानं कारवाई करावी. मी पोलीस महानिरिक्षक रश्मी शुक्ला यांना मेसेज केला होता. त्या आजारी आहेत. पण मी 7 तारखेला त्यांना भेटायला जाणार आहे," असंही अंजली दमानिया म्हणाल्या.  

नक्की वाचा >> Santosh Deshmukh Murder Case: नव्या फोटोने एकच खळबळ; वाल्मिक कराडसोबतची 'ती' व्यक्ती कोण?

एकाच समाजाची किती लोक?

"किती लोक एकाच समाजाची आहे, पोलिसात किती आहे? शासनाचे नियम पाळले गेले पाहिजे," असंही अंजली दमानिया म्हणाल्या. "शासनाने थेरं चालवले आहे. एसआयटी, सीआयडी चौकशी ही धूळफेक आहे. बीड जिल्ह्यात एसआयटी चौकशी करायला देत असाल तर काय खाक चौकशी करतील? चौकशी करणारी सगळी वाल्मिक कराडला नमस्कार करणारे लोक आहेत," असं अंजली दमानिया म्हणाल्या. "बाहेरुन माणसं आणा, एसआयटी बरखास्त करा ही आमची मागणी आहे," असं दामनिया म्हणाल्या.