किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : बडगाम हेलिकॉप्टर अपघात दुर्घटनेत शहीद झालेले वैमानिक निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर नाशिक इथं अंत्यसंस्कार पार पडले. लष्करी इतमामात निनाद यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी शोकाकूल वातावरणात कुटुंबीय आणि नाशिककरांनी गर्दी केली होती.
आज सकाळी लिडर निनाद मांडवगणे यांचं पार्थिव नाशिकला त्यांच्या राहत्या घरी दाखल झालं. निनादच्या घराबाहेर निनाद यांचे नातेवाईक आणि नाशिककर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव ठेवण्यात आलं होतं. यावेळी, निनाद यांच्या पार्थिवाला त्यांच्या अवघ्या दोन वर्षांच्या मुलीने डोकं टेकून नमस्कार केला आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले.
गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांचं पार्थिव ओझर विमानतळावर आणण्यात आलं. त्याठिकाणी भारतीय सैन्याकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासह अधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शहीद जवानाचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. निनादच्या घराबाहेर निनाद यांचे नातेवाईक आणि नाशिककर मोठ्या संख्येनं उपस्थित आहे. दर्शनासाठी निनाद यांचं पार्थिव ठेवले जाणार आहे. निनाद यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तयारी सुरू आहे.
'आम्हाला भेटायला आला तर तो आमचा नाही आला तर तो भारतमातेचा, अशी भावना मनाशी बाळगून आम्ही दिवस कंठत असतो. निनादने आज आपल्या सेवेत असताना आमचे आणि देशाचे नावं मोठ केलं आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशी निनादच्या वडिलांनी व्यक्त केलीय.
दरम्यान, निनादचे आई-वडील आपापल्या सेवेतून निवृत्त झालेत. निनादचे वडील बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत होते. निनाद हा त्यांचा मोठा मुलगा... दुसरा मुलगा जर्मनीत सीए म्हणून कार्यरत आहे. निनादच्या मागे त्यांची पत्नी आणि दोन वर्षांची मुलगी आहे.
नाशिकचा सुपुत्र असलेल्या निनादचा जन्म १९८६ चा... त्यांचं शिक्षण भोसला मिलिटरी स्कूल आणि औरंगाबादच्या सैनिक संस्थेत झालं होतं. त्यानंतर त्यांनी बी. ई. मेकॅनिकल इंजिनीयरिंग पूर्ण करून हैद्राबाद ट्रेनिंग कमिशनमध्ये ट्रेनिंग पूर्ण केलं... आणि २००९ साली तो भारतीय वायुदलात स्कॉड्रन लिडर पदावर सेवेत रुजू झाला. गुवाहाटी, गोरखपूर इथं सेवा केल्यानंतर केवळ महिन्यापूर्वीच त्यांची श्रीनगर येथे बदली झाली होती.