Bypoll Election : पुण्याच्या (Pune News) कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (mukta tilak) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (laxman jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. या जागांवर बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केले आहेत. तर दुसरीकडे कसबा आणि चिंचवड या दोन मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने (BJP) आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने कसब्यातून हेमंत रासने आणि चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर होताच विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. मात्र त्याऐवजी पक्षानं हेमंत रासने यांना उमेदवारी दिलीय. पक्षाचा निर्णय मान्य असला तरी त्याबद्दलची नाराजी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी व्यक्त केलीय. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर नैसर्गिक न्यायाने कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळायला पाहिजे होती. आपल्याला उमेदवारी दावलल्यामुळे ब्राह्मण समाजामध्ये अन्यायाची भावना निर्माण होऊ शकते, अशी प्रतिक्रिया शैलेश टिळक यांनी दिली आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणूक मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर आम्ही सांगितलं होतं की ताई यांचे अर्धवट स्वप्न पूर्ण होण्यासाठी आम्ही इच्छुक होतो. त्यामुळे घरातील सदस्याला उमेदवारी मिळाली पाहिजे होती. अशावेळी घरच्या कुटुंबियांना उमेदवारी मिळते त्यामुळे ती मिळेल अशी आशा वाटत होती. पण पक्षाने वेगळा विचार करून रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण पक्षाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे आणि त्यांना शुभेच्छा आहेत, असे शैलेश टिळक म्हणाले.
...तर निवडणूक बिनविरोध झाली असती - शैलेश टिळक
फडणवीस यांनी काल भेट झाली आणि यावेळी निवडणुकीबद्दल चर्चा झाली. हा निर्णय दिल्ली वरुन होईल असे देखील त्यांनी सांगितले होते. ताई गेल्यानंतर त्यांनी आमची भेट फार कमी वेळासाठी घेतली होती म्हणून काल ते पुन्हा घरी आले होते. घरच्या सदस्याला उमेदवारी दिली असती तर बिनविरोध होण्याची शक्यता जास्त होती. पण पक्षाचा निर्णय आम्हाला मान्य आहे, असेही शैलेश टिळक म्हणाले.
या पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबीयांच्या रूपाने ब्राह्मण समजाला नेतृत्व करण्याची संधी पुन्हा मिळेल असे वाटत होते. मात्र पक्षाने हेमंत रासने यांना संधी दिली आहे. याबाबतही शैलेश टिळक यांनी भाष्य केले. "पुणे शहरात सध्या एकही ब्राह्मण उमेदवार नसल्याने ब्राह्मण समाजात ती अन्यायाची भावना आहे. ती लोकांच्या मनात असण्याची शक्यता आहे," असे शैलेश टिळक म्हणाले.