Sharad Pawar on Election Result: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) आज साताऱ्यात (Satara) पत्रकार परिषद घेतली. निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पहिल्यांदाच त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली. यावेळी त्यांनी निकालावर भाष्य करत, अनेक प्रश्नांवर मनोकळेपणाने उत्तरं दिली. दरम्यान यावेळी त्यांनी आपण घरी बसणार नसून, पुन्हा एकदा जोमाने उभे राहणार आहोत असं सांगितलं आहे.
Sharad Pawar on Result: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'शेवटी लोकांनी...'
जसा निकाल लागला आहे तो पाहता एखादा घरी बसला असता. मी काही घरी बसणार नाही. मी पुन्हा एकदा जोमाने, कतृत्वाने संघटना उभी करण्यासाठी दौरा करत आहे," असा निर्धार शरद पवारांनी व्यक्त केला आहे. उद्या विजयी उमेदवारांची बैठक होणार आहे आणि परवा सर्व उमेदवार यांची जयंत पाटील यांच्या अध्यक्षते खाली बैठक होणार आहे त्याला मी ही उपस्थित राहणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली.
"बारामतीत कोणीतरी उभं राहायला हवं होतं. जर उमेदवार दिला नसता तर महाराष्ट्रात काय संदेश गेला असता. कोणीतरी निवडणूक लढण्याची गरज होती. अजित पवार आणि युगेंद्र पवार यांची तुलना होऊ शकत नाही याची आम्हाला कल्पना होती. अजित पवार गेल्या अनेक वर्षांपासूनचं राजकारण, सत्तेतील स्थान आणि नवखा तरुण एका बाजूला याची आम्हाला जाणीव होती," असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.
महायुतीला लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला का? असं विचारलं असता शरद पवार म्हणाले की, "आम्ही लोकांकडून, कार्यकर्त्यांकडून जी माहिती घेतली त्यातून हे एक महत्त्वाचं कारण आहे असं ऐकायला मिळत आहे. आम्ही सत्तेत नसलो तर पैसे देणं बंद होईल असं सांगण्यात आलं. महिलांचं मतदान वाढलं आहे असं आताच्या आकडेवारीवरुन दिसत आहे".
लोकसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारची भूमिका जनतेने घेतली होती, तशी आता घेतली नाही. सर्वांनी कष्ट केलं पण निकाल हवा तसा लागला नाही अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली. तसंच ईव्हीएम आणि पैशांच्या आरोपांवर त्यांनी भाष्य करणं टाळलं. मी काही सहकाऱ्यांचं मत ऐकलं आहे, पण अधिकृत माहिती येत नाही तोर्यंत त्यावर भाष्य करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.
"बटेंगें तो कटेंगे यामुळे ध्रुवीकरण झालं. योगींनी केलेल्या विधानामागे मतांचं ध्रुवीकरण व्हावं असा दृष्टीकोन होता. धार्मिक बाजू देण्याचा प्रयत्न काही जणांनी केला त्यामुळे हे झालं असं दिसत आहे," असंही शरद पवारांनी सांगितलं.