पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसकडून शुक्रवारी पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता त्यांच्याकडून अधिकृत प्रचाराला सुरुवात होणार आहे. पार्थ पवार यांचे आजोबा आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे स्वत: त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या संध्याकाळी शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ यांना अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर केल्यानंतर स्थानिक पातळीवर वेगाने हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी नुकतीच राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यानंतर पिंपरी-चिंचवडपासून पार्थ यांच्या प्रचाराला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मावळमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास पार्थ पवार सुरुवातीपासून आग्रही होते. मात्र, शरद पवार त्यासाठी राजी नव्हते. मध्यंतरीच्या काळात शरद पवार स्वत: माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. एकाच घराण्यातील लोक निवडणुकीला उभे राहिले तर चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे पवारांनी सुरुवातीला मी आणि सुप्रिया सुळेच लोकसभेच्या रिंगणात उतरू, असे सांगितले होते. मात्र, अजित पवार काही केल्या पार्थ यांच्या उमेदवारीचा हट्ट सोडायला तयार नव्हते. त्यामुळे शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेत पार्थ यांच्या लोकसभा उमेदवारीचा मार्ग मोकळा केला.
पवार कुटुंबीयांची डिनर डिप्लोमसी?
पार्थ पवार यांना लोकसभा निवडणुकीची उमेद्वारी निश्चित झाल्यावर पवार कुटुंबीयांनी सेलिब्रेशन केले. पार्थच्या लोकसभा निवडणूक लढण्यावरुन पवार कुटुंबात वाद सुरु असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. एवढचं नाही तर, शरद पवार यांनी निवडणूक लढण्याबाबत पुर्नविचार करावा अशी फेसबुक पोस्ट रोहीत पवार यांनी केल्याने पार्थ आणि रोहीत यांच्यात संघर्ष असल्याचीही चर्चा सुरु होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री पवार कुटुंबातील काही सदस्यांनी एकत्र येऊन सेलिब्रेशन केले. यावेळी सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि सोबतच रोहीत पवारही उपस्थित होते. या सेल्फीत सुप्रिया आणि पार्थ असे दोन लोकसभेचे उमेदवार आहेत. तर जिल्हा परिषदेचा सदस्य असलेला रोहितही या फोटोत आहे. या सेलिब्रेशनचे फोटो पवार कुटुंबीयांनी आपल्या समाज माध्यमांवर अपलोड केल्याने पुन्हा एकदा पवार कुटुंबाबाबत चर्चा सुरु झालीय.