Election Commission Of India: शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आणि शिवसेना हे (Shivsena Name and Symbol) नाव एकनाथ शिंदे गटाला देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) दिला आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. निकालपत्रात निवडणूक आयोगाने काय म्हटलंय जाणून घ्या...
2018 मध्ये शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेला बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आलेला नाही, असं निवडणूक आयोगाने म्हटलंय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेल्या 1999 च्या पक्षाच्या घटनेत असलेले पक्षांतर्गत लोकशाही निष्कर्ष बदलण्यात आले. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाच्या घटनेतील बदल निवडणूक आयोगाकडून संमत करुन घेतले होते. पण 2018 मध्ये झालेले बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आले नाहीत, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
शिवसेना पक्षाने 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत केलेले बदल लोकशाहीशी सुसंगत नाहीत, असं निरीक्षण निवडणूक आयोगानं नोंदवलं आहे. पक्षांतर्गत निवडणुका न घेता शिवसेनेने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर निवडणूक आयोगाचा विश्वास गमावला आहे.
दरम्यान, ''बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आहे. लोकशाहीचा हा विजय आहे. हा घटनेचा विजय आहे'', अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ''आमचं सरकार नियम आणि कायद्याने स्थापन झालंय.'' त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय मेरीटवर असल्याचं मत देखील एकनाथ शिंदेंनी म्हटलंय.