जालना : शिवसेनेचे माजी राज्यमंत्री आणि जालन्यातील शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्या वाढदिवसानिमित्त जालना शहरात शिवसैनिकांनी 'भावी खासदार' असा उल्लेख केलेले बॅनर लावले आहेत.
त्यामुळे अर्जुन खोतकर २०२४ लोकसभा निवडणूकीत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीपासून अर्जुन खोतकर आणि रेल्वे राज्यमंत्री आणि जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्यात विस्तव देखील जात नाही.
ईडी कारवाईवरुन अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर आरोप केले होते. दानवे यांच्यामुळेच ईडीचा ससेमिरा आपल्यामागे लागल्याचचं खोतकर यांनी एका जाहीर कार्यक्रमात म्हटलं होतं. तसचं आपण जालना लोकसभा निवडणूक लढणार असल्याचंसुद्धा त्यांना स्पष्ट केलं होतं. या पार्श्वभूमीवर अर्जुन खोतकर यांच्या बॅनरबाजीमुळे जालनातील दानवे विरुद्ध खोतकर वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी केली होती. मात्र त्यावेळी शिवसेना-भाजप युती असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी तलवार मॅन केली होती. पण आता २०२४ ची लोकसभा निवडणुक अर्जुन खोतकर लढणार का अशी चर्चा सध्या जिल्ह्यात रंगली आहे.
खोतकरांवर काँग्रेसचीही टीका
अर्जुन खोतकरांच्या या बॅनरबाजीवर काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल यांनी हल्ला (Kailas Gorantyal) चढवला आहे. जे २५ वर्ष राजकारणात राहिले आणि २५ वर्षापैकी ज्यांनी १० वर्ष मंत्री मंत्री राहून एकही विकासाचं काम केलेलं नाही.त्यांनी स्वतःला भावी खासदार म्हणून घेऊ नये. खासदार होण्याचं स्वप्नही पाहू नये. ज्यांची ग्रामपंचायतमध्ये निवडून येण्याची लायकी नाही त्यांनी खासदारकीचं स्वप्न पाहू नये अशा शब्दात गोरंटयाल यांनी खोतकरांची खिल्ली उडवली आहे