नाशिक : भाजप आणि शिवसेना युतीमधील वादाचा फटका मुख्यमंत्र्यांना नाशिकमध्ये बसणार आहे. भाजपची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेत शिवसेनेनं आपला महापौर बसवण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे महाशिवआघाडी उभारण्याचा प्रयत्न कसोशीने केला जातो. महापौरपदासाठी आतापर्यंत 15 इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत. त्यामध्ये नऊ जण भाजपचे नगरसेवक आहेत. तर सेनेच्या चार काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी एका नगरसेवकाने महापौरपदासाठी अर्ज नेले आहेत.
उपमहापौर पदासाठी 15 नगरसेवक इच्छुक आहेत. त्यामुळे एकूणच या ठिकाणीही महापौरपदावरून वाद रंगलाय. महापौरपदाची निवडणूक २२ नोव्हेंबरला होणार असून भाजपपुढे सत्ता राखण्याचं आव्हान आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट होणार आहे. दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास ही भेट होणार आहे. महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी पवार मोदींना भेटणार आहेत. या बैठकीला शिवसेनेचे खासदारही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचं कौतुक केलं होतं. मात्र यात कोणताही राजकीय ट्वीस्ट असल्याची शक्यता संजय राऊत यांनी फेटाळली.
आघाडीची बैठक होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची दुपारी दिल्लीत बैठक होणार आहे. मुख्यमंत्रीपद अडीच वर्षासाठी मिळावे ही राष्ट्रवादीची भूमिका कायम आहे. पहिले अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रीपद आणि नंतरची अडीच वर्ष राष्ट्रवादीला मिळावे अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. शिवसेनेचे 56 तर राष्ट्रवादीचे 54 आमदार आहेत, यात फारसा फरक नसल्यानेच राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदावर दावा आहे. राष्ट्रवादीच्या आज दुपारच्या बैठकीत यावर पुन्हा चर्चा होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी काँग्रेसबरोबरच्या बैठकीतही यावर चर्चा होईल.