Special Report on Taliram Sammelan: आजवर तुम्ही कवीसंमेलन, साहित्य संमेलन झाल्याचं ऐकलं असेल. मात्र अमरावतीत चक्क तळीरामांचं संमेलन होणार आहे. विशेष म्हणजे आजी-माजी असे 200 मद्यपी या संमेलनात सामील होऊन आपल्या अनुभवांचं कथन करणार आहेत. हे संमेलन तळीरामांनी एकत्र येऊन आयोजित केलेलं नाही तर अल्कोहोलिक्स ऍनानिमस संस्थेच्या पुढाकारातून हे अनोखं संमेलन भरवण्यात येतंय. दारुमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. आर्थिक परिस्थिती खालावते, आरोग्याची समस्य उद्ध्भवते. त्यामुळे जनजागृती करण्यासाठी हे संमेलन भरवण्यात येणार आहे.
दारुच्या आहारी गेलेले डॉक्टर, प्राध्यापक, अभियंतेही या संमेलनात सामील होणार आहेत. व्यसनाच्या आहारी कसे गेले आणि त्यातून बाहेर कसे आले याचं कथन हे सर्व जण करणार आहेत. राज्यात वर्धा आणि गडचिरोलीत दारुबंदी आहे. चंद्रपुरातही दारुबंदी होती. मात्र ती उठवण्यात आली. हे तीनही जिल्हे विदर्भातले. आता विदर्भातल्याच अमरावतीत दारुविरोधी जनजागृतीसाठी संमेलन भरतंय. अशा संमेलनामुळे दारूमुक्ती अभियानाला बळ मिळालं तर राज्यातल्या सर्वत भागात अशी संमेलनं आयोजित करायला हवीत.
दरम्यान, दारू पिण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य असल्यानं सरकारने त्यात पडू नये, असं उच्च मध्यम वर्ग म्हणतो. त्यांच्या जागी ते योग्यही असेल; पण गरीब कुटुंबात दारूवरील खर्चाने संपूर्ण कुटुंब अडचणीत सापडतं, हे देखील तितकंच खरं आहे. त्यामुळे मायबाप सरकार म्हणून सरकारने अचूक निर्णय घेणं गरजेचं आहे.
दरम्यान, 1975 ला वर्धा जिल्ह्यात दारूबंदी कायदा लागू करण्यात आला. मात्र, दारूबंदी वर्धा जिल्ह्यात मागील वर्षभरात 6 कोटी 57 लाख 49 हजार 405 रुपयांचा मद्यसाठा पोलिसांनी जप्त करण्यात आला होता. 2015 सालापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी लागू होती. मात्र, ही दारूबंदी उठवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर मागील वर्षी चंद्रपूर जिल्ह्यामधली दारूबंदी उठवण्यात आली. दारूबंदी लागू केल्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू सेवन आणि त्याची विक्री वाढली होती. त्यामुळे सरकारवर मोठा दबाव होता.