Solapur Lok Sabha Constituency : सोलापूरच्या चादरीनं देशाच्या नकाशात सोलापूरची ओळख निर्माण केली... उद्योगांचं, मेहनती कामगारांचं शहर... खाद्यसंस्कृतीचा वारसा जपणारं शहर... शेंगाची चटणी, कडक भाकरी म्हटलं की सोलापूरची हमखास आठवण होते. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा... महाराष्ट्रातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं विठ्ठल-रखुमाईचं पंढरपूर, स्वामी समर्थांचं अक्कलकोट ही प्रसिद्ध तीर्थक्षेत्रं... ज्वारीचं कोठार, संतांची भूमी अशी ओळख मिरवणारा मंगळवेढा... गिरणगाव म्हणून जगभरात मिरवणारा सोलापूरचा कापड उद्योग.... रेल्वेमार्गानेही सोलापूरला देशातील अनेक महानगरांना जोडले आहे. मराठी, कन्नड आणि तेलुगू या तीन भाषिकांची लक्षणीय संख्या असलेलं... त्यातही लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात असल्याने कन्नड भाषेचा मोठा प्रभाव असलेलं सोलापूर आता कोणाला सत्ता देणार? हे पाहणं महत्त्वातं ठरणार आहे.
सोलापुरातल्या मतदारांचे प्रश्न
सोलापुरी चादरीच्या उद्योगात मंदी आहे. बिडी कामगारांचेही प्रश्न तसेच आहेत. गिरणगाव म्हणून ओळख असणाऱ्या याच सोलापूरमध्ये अनेक मोठ्या मिल्स बकाल आणि बंद अवस्थेत आहेत. रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने तरुणांचं हैदराबाद, मुंबई, पुण्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतंय. सोलापूरची वरदायिनी म्हणून ओळख असणाऱ्या उजनीचं पाणी अजूनही अनेक तालुक्यांमध्ये पोहोचलेलं नाही. उडाण योजनेत निवड झाली असली तरी तांत्रिक कारणाने सोलापूरची विमानसेवा अजूनही बंदच आहे. सोलापूरची विमानसेवा आणि पाणीप्रश्न केव्हा मिटणार या प्रतीक्षेत सोलापूरकर आहेत. आपले प्रश्न सोडवणारा खासदार सोलापूरकरांना हवाय.
सोलापूर हा तसा काँग्रेसचा गड.. सोलापूरचे खासदार सुशीलकुमार शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय ऊर्जामंत्री, लोकसभेचे सभागृह नेते अशी मोठी पदं भुषवली. मात्र 2014 च्या मोदी लाटेत सुशीलकुमार शिंदेंचाही निभाव लागला नाही. 2019 मध्ये सलग दुसऱ्यांदा सुशीलकुमार शिंदेंना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचे डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या मध्ये तिरंगी लढत झाली. भाजपच्या डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी 5 लाख 24 हजार 985 मते मिळवत बाजी मारली. सुशीलकुमार शिंदेंचा 1 लाख 58 हजार 608 मतांनी दारुण पराभव केला होता. तर यावेळी वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांना एक लाख 70 हजार मते मिळाली होती. प्रकाश आंबेडकरांमुळेच सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाल्याची चर्चा देखील यावेळी रंगली होती.
सोलापूरमध्ये यंदा मात्र हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. सुशीलकुमार शिंदेंऐवजी आता त्यांची लेक आणि विद्यमान आमदार असलेल्या प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. तर भाजपनेही प्रणिती शिंदेंविरोधात राम सातपुतेंच्या रुपाने तगडा उमेदवार दिलाय. विधानसभेत आक्रमक चेहरा म्हणून राम सातपुतेंची ओळख आहे. उसतोड कामगाराचा मुलगा ते भाजप आमदार असा राम सातपुतेंचा प्रवास आहे.
सोलापुरात आता तीन टर्म आमदार असणाऱ्या प्रणिती शिंदे यांच्याविरोधात एक टर्म आमदार असणाऱ्या राम सातपुते अशी लढाई रंगणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच ठिकाणी भाजप आणि मित्र पक्षांचे आमदार आहेत. त्याचा फायदा सातपुतेंना होणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल.
2014 आणि 2019 नंतर आता 2024 मध्येही भाजप सोलापूरमध्ये विजयाची नोंद करत हॅटट्रिक साजरी करणार का? की प्रणिती शिंदे विजय साकारत काँग्रेसला मतदारसंघ परत मिळवून देणार? आणि वडिलांच्या पराभवाचं उट्टं काढणार का? याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय.