Twin Sisters Marriage : सोलापुरातल्या (Solapur) एका तरुणाने मुंबईतील दोन जुळ्या बहिणींसोबत एकाच मांडवात केलेले लग्न सध्या चर्चेचा विषय आहे. पिंकी आणि रिंकी या उच्च शिक्षित जुळ्या बहिणींनी अतुल उत्तम अवताडेसोबत लग्नगाठ बांधली आहे. पण आता राहुल फुले नावाच्या व्यक्तीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या अतुलविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता 1860 च्या 494 कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात (Akluj Police Station) हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे त्यांच्या लग्नाला कायदेशीर मान्यता आहे का अशी एकच चर्चा सगळीकडे सुरु झालीय.
एकाच तरुणासोबत का लग्न केले?
मुंबईच्या सांताक्रूझ परिसरात राहणाऱ्या पिंकी आणि रिंकी (Rinky Pinky Atul marriage) या तरुणी 2 डिसेंबर रोजी अकलूज जवळील गलांडे हॉटेलमध्ये अतुलसोबत लग्नबंधनात अडकल्या. दोघी एकमेकीपासून वेगळं राहू शकत नसल्यामुळे त्यांनी एकाच मुलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही परिवारांच्या संमतीने हा विवाह सोहळा पार पडला आहे.
कायद्यानुसार हे लग्न मान्य आहे का?
तक्रारीनंतर अतुलविरोधात भारतीय दंड विधान 494 नुसार अदखपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुलने पिंकी आणि रिंकीसोबत हिंदू पद्धतीने विवाह केला आहे. हिंदू धर्मासाठी हिंदू विवाह कायदा 1995 लागू होता. भारतात पर्सनल लॉ अंतर्गत आणि विशेष विवाह कायदा, 1956 अंतर्गत अशा दोनप्रकारे लग्न होतात. या दोन्ही कायद्यात दुसरं लग्न करणे गुन्हा आहे.
भारतीय दंड संहिता, 1860 च्या 45 अंतर्गत कलम 494 नुसार दुसरा विवाह हा दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकारचा गुन्हा केल्यास किंवा दुसरं लग्न केल्यास सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
त्यामुळे कायद्यानुसार जोडीदार जिवंत असताना किंवा त्याच्यापासून कायदेशीर घटस्फोट घेतलेला नसताना दुसऱ्या विवाहाला कायदेशीर मान्यता नसते. त्यामुळेच हा गुन्हा ठरतो आणि शिक्षा होऊ शकते.
संमतीने केलेले लग्नसुद्धा अवैधच
या प्रकरणात रिंकी आणि पिंकी यांनी आपण सज्ञान असल्याचे सांगत संमतीने लग्न केल्याचे म्हटले आहे. पण दोघांचीही समंती असतानाही केलेले लग्न कोणत्याही परिस्थितीत वैध ठरत नाही.