मुंबई : ST Strike News : राज्यातील एसटी संपाबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. राज्य सरकारकडून संप मागे घेण्याचे आवाहन करुनही संप एसटी कर्मचाऱ्यांनी मागे घेतलेला नाही. दरम्यान, एसटी संपाबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारला 1 एप्रिलला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे न्यायालयाचे निर्देश दिले आहेत. आता यापुढची सुनावणी 5 एप्रिलला होणार आहे.
ST महामंडळ विलीनीकरणावर आजही निर्णय झालेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणावर अंतिम भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.1 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर 5 एप्रिलला होणाऱ्या पुढील सुनावणीत उत्तर देण्याचे राज्य सरकारला निर्देश देण्यात आले आहेत.
अर्थसंकल्प अधिवेशन सुरू असल्याने निर्णय घेण्यात उशीर होत असल्याची कबुली राज्य सरकारने आज न्यायालयात दिली. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनाही न्यायालयाने चांगलेच फटकारले. तुम्ही फक्त संपकरी कामगारांचा विचार करताय, एसटीविना हाल सोसणाऱ्या जनतेचा विचार कोण करणार? असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला.
दरम्यान, कोरोनाकाळात ड्युटी करताना जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीने विचार करा, नुकसानभरपाई मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी, असे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बजावले.