औरंगाबाद : कचरा प्रश्नावर सुप्रीम कोर्टानेही औरंगाबाद महापालिकेला दिलासा मिळाला नाही. औरंगाबाद खंडपीठाच्या नारेगावमध्ये कचरा टाकू नये, या अंतरिम आदेशाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. औरंगाबाद खंडपीठाच्या अंतरिम निर्णयाविरोधात महापालिका सुप्रीम कोर्टात गेली होती.
कच-याच्या प्रश्नावर औरंगाबाद खंडपीठानं महापालिकेला जोरदार झटका दिलाय. औरंगाबाद खंडपीठानं नारेगाव कचरा डेपोत कचरा न टाकण्याचे अंतरिम आदेश दिले होते. अंतिम तोडगा निघेपर्यंत कचरा टाकू देण्याची विनंती महापालिकेनं केली होती. मात्र खंडपीठानं ती फेटाळलीय. त्यामुळे कचराकोंडी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.
कचरा प्रश्नावरून वातावरण चांगलंच तापलंय. मिटमिटा परिसरात महापालिकेच्या गाड्या कचरा टाकण्यासाठी गेल्या असता संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत दगडफेक केली गेली. या दगडफेकीत तीन पोलीस जखमी झाले होते. जमाव पांगवण्यासाठी पोलीसांना लाठीचार्ज करावा लागला.
महापालिकेचे पथक पोलीस बंदोबस्तात कचरा टाकण्यासाठी जागा पाहायला आले होते. यावेळी नागरिकांनी तीव्र विरोध केला. नागरिकांनी महापालिकेच्या पथकाला आणि पोलिसांना विरोध केला. नागरिक थेट पोलिसांच्या अंगावर धावून गेले. इतकेच नाही तर पोलीस आणि नागरिकांमध्ये बाचाबाचीही झाली. त्यानंतर पोलिसांनी नागरिकांवर लाठीमार केला. त्यानंतर याठिकाणी मोठा राडा पाहायला मिळाला.