वसई : वसई विरार महापालिका क्षेत्रात स्वाईन फ्लूची साथ सुरु झाली असून, एकट्या जून महिन्यातच स्वाईन फ्लूचे २२ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी चार रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
वसई विरार पालिकेकडे वसई आणि नालासोपारा परिसरात दोन मोठी रुग्णालयं आहेत. या दोन्ही रुग्णालयांत अत्याधुनिक पध्द्तीची प्रसुतीगृहं आहेत. त्यामुळे हे वॉर्ड संसर्गजन्य आजारांसाठी मोठा धोका ठरु शकतात.
मागील एक महिन्यापासून वसई विरार शहरात रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे हवामानातही बदल झाला आहे. सर्दी, खोकला, ताप, असे आजार या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याच आजारांतून स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य आजार या परिसरात वाढला आहे.