ठाणेकर तरुणाला महिलेचा व्हिडिओ कॉल, अश्लील कृत्ये करताना दिसली, अन् थोड्याच वेळात

Sextortion Crime In Thane: सायबर क्राइमचा विळखा वाढत असतानाच आता सेक्सटॉर्शन हा नवीन प्रकारही समोर आला आहे. तरुणांसह पौढापर्यंत सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकत आहेत.   

मानसी क्षीरसागर | Updated: May 31, 2023, 04:51 PM IST
ठाणेकर तरुणाला महिलेचा व्हिडिओ कॉल, अश्लील कृत्ये करताना दिसली, अन् थोड्याच वेळात title=
Thane man falls prey to sextortion loses Rs 6 5 lakh

Sextortion Crime In Thane: सेक्सटॉर्शनची (Sextortion) अनेक प्रकरणे मुंबईत (Mumbai) घडत आहेत. ठाणे शहरात राहणाऱ्या ३९ वर्षांचा तरुणही सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकला आहे. महिलेने व्हिडिओ कॉल (Fake Video Call) करत या तरुणाला ६. ५० लाख रुपयांचा गंडा घातला आहे. पीडित तरुणाने या प्रकरणाची तक्रार पोलिसांत दिली असून या प्रकरणी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. 

तरुणीचा व्हिडिओ कॉल आला

तरुणाने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, १७ मार्च रोजी त्याला एका अज्ञात नंबरवरुन व्हिडिओ कॉल आला होता. व्हिडिओ कॉलवर एक महिला होती. सुरुवातीला ही महिला माझ्याशी व्यवस्थित बोलत होती. त्यानंतर मध्येच तिने तिचे कपडे काढण्यास सुरुवात केले. त्यामुळं मी घाबरुन फोन लगेच कट केला. 

अज्ञात नंबरवरुन स्क्रीनशॉट पाठवले

'फोन कट केल्यानंतर मी पुन्हा माझ्या कामात गुंतलो होतो. त्याचवेळी माझ्या फोनवर ज्या महिलेने व्हिडिओ कॉल केला होता तिचा एक व्हिडिओ आणि काही स्क्रीन शॉटचे मेसेज करण्यात आले होते. यात व्हिडिओ कॉलवर बोलत असल्याचे रेकॉर्डिंगदेखील होते. काहीवेळाने समोरील व्यक्तीने ते सगळे मेसेज स्वतःहून डिलीट केले. त्यानंतर घटनेच्या दोन दिवसांनतर मला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला,' असं तरुणाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. 

दिल्ली पोलिस असल्याचा दावा

'अज्ञात नंबरवरुन आलेला फोनवरुन बोलणारा व्यक्तीने स्वतःला दिल्ली पोलिस आयुक्त असल्याचा दावा केला होता. तसंच, जिचा तुम्हाला कॉल आला होता ती सेक्स रॅकेट चालवत होती. पोलिस तिचा शोध घेत असून तपास करत असताना एक व्हिडिओ सापडला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होणार होता, असं आरोपीने पिडीत तरुणाला सांगितलं. जर हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होण्यापासून थांबवायचं असेल तर मी सांगितलेल्या एका नंबरवर संपर्क कर', असंही तरुणाला सांगण्यात आले. 

६.५० लाख रुपयांची फसवणूक

तरुणाने आरोपीने सांगितल्यानुसार त्या नंबरवर फोन केला. फोनवरील व्यक्तीने त्याला व्हिडिओची भीती घालत ५० हजार रुपयांची मागणी केली. तरुणानेही आरोपीला ५० हजार रुपये पाठवले. त्यानंतर १८ मार्च ते २५ मार्च या कालावधीत आरोपींनी पीडित तरुणाला धमकावून तब्बल ६. ५० लाख रुपये वसूल केले. 

अटक करण्यात अपयश

आरोपींचा त्रास वाढत असताना अखेर पीडित तरुणाने मंगळवारी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी १५ जणांविरोधात तक्रार दाखल करुन याप्रकरणी तपास सुरू केला आहे. दरम्यान, अद्याप कोणलाही अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.