सुट्टी दिली नाही म्हणून कर्मचाऱ्याने सहकाऱ्यांना भोसकलं; नंतर हातात चाकू घेऊन....; पोलिसांचा रस्त्यावर पाठलाग

Crime News: आरोपीने चाकूच्या सहाय्याने आपल्या 4 सहकाऱ्यांना भोसकलं आणि नंतर तो हातात घेऊन शहरात फिरत होता.   

शिवराज यादव | Updated: Feb 7, 2025, 02:36 PM IST
सुट्टी दिली नाही म्हणून कर्मचाऱ्याने सहकाऱ्यांना भोसकलं; नंतर हातात चाकू घेऊन....; पोलिसांचा रस्त्यावर पाठलाग title=

Crime News: पश्चिम बंगालमध्ये सरकारी कर्मचाऱ्याने आपल्याच चार सहकाऱ्यांना चाकूने भोसकलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कर्मचाऱ्याने सुट्टी नाकारण्यात आल्याने त्याचा राग आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांवर काढला. अमित कुमार सरकार असं आरोपी कर्मचाऱ्याचं नाव आहे. सहकाऱ्यांना भोसकल्यानंतर आरोपी रक्ताळलेला चाकू घेऊन फिरत होता. आरोपी रस्त्यावर फिरत असताना काहींनी व्हिडीओ शूट केला असून, तो व्हायरल झाला आहे. 

अमित सरकार हा कोलकात्याच्या न्यूटाऊन परिसरातील कारीगारी भवनच्या तांत्रिक शिक्षण विभागात काम करत होता. एका व्हिडिओत तो भरदिवसा हातात चाकू घेऊन फिरताना दिसत आहे. यावेळी त्याच्या पाठीवर आणि हातात एक बॅग दिसत आहे. रस्त्यावरुन जाणारे काही जण मोबाईल फोनवर त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करताना दिसत आहेत. तसंच यावेळी आरोपी अमित त्यांना माझ्या जवळ येऊ नका असा इशारा देत आहे. 

"उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील सोदेपूर येथील घोला येथील रहिवासी सरकार हा तांत्रिक शिक्षण विभागात काम करतो. आज सकाळी सुट्टी घेण्यावरून त्याच्या सहकाऱ्यांशी झालेल्या भांडणानंतर त्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला आणि नंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला," असं एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. 

जखमी झालेल्या सहकाऱ्यांची नावं जयदेव चक्रवर्ती, शंतनु साहा, सार्थ लाटे आणि शेख सताबुल अशी आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रजा नाकारण्यात आल्याने आरोपी कर्मचारी संतापला होता, त्याला रजा का नाकारण्यात आली हे अद्याप समोर आलेलं नाही. सरकारला अटक करण्यात आली आहे आणि अधिक तपास सुरू आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.पोलिसांना संशय आहे की त्याला मानसिक आरोग्य समस्या असू शकतात.