कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : बातमी तुमच्या आमच्या घरातली... तुमच्या रोजच्या जेवणात काय खाताय? तुम्ही रोज हिरव्यागार ताज्या ताज्या भाज्या खाताय, त्या तुमच्या आरोग्यासाठी सुरक्षित आहेत का? या भाज्या कुठे पिकतात, त्या तुमच्या आमच्या घरापर्यंत कशा पोहोचतात.... याचा आम्ही शोध घेतला तेव्हा धक्कादायक सत्य समोर आलंय. आपण रोज ज्या भाज्या खातोय, त्या चांगल्या दर्जाच्या आहेत का ? या प्रश्नाचं उत्तर शोधताना आम्हाला धक्कादायक वास्तव आढळलं.
कळवा भागातल्या हिरव्यागार भाज्यांमागे दडलंय एक काळं वास्तव.... पालक, मटकी, मुळा, लाल माठ या भाज्यांचं पीक इथे घेतलं जातंय... वरवर ताज्या-ताज्या आणि हिरव्यागार दिसणाऱ्या भाज्या गटारीतल्या पाण्यावर पिकतायत. 'झी 24 तास'ची टीम या ठिकाणी पोहोचली. नाल्यावर पंप लावून पाणी उपसलं जात होतं... इथे काम करणारे कामगार हे पाणी भाज्यांपर्यंत पोहोचवत होते... तुमच्या आमच्या घरात येणारी पालक, मुळा, चवळी कितीही टवटवीत दिसत असली तरी तिच्या मुळांना जे पाणी मिळतंय ते प्रचंड दूषित आहे. ई-कोला विषाणू असलेल्या पाण्यावर या भाज्या पिकतायत.... एका प्रकारे पैसे देऊन विष खरेदी केलं जातंय. विशेष म्हणजे, याच भागात राहणाऱ्या नागरिकांना आपण कुठल्या पाण्यात पिकणाऱ्या भाज्या खातोय, याची कल्पनाही नव्हती.
अत्यंत दूषित पाण्यावर या भाज्या पिकवल्या जातात, याचा पर्दाफाश 'झी 24 तास'नं केला. भाज्या पिकल्यावर त्यांचा आपल्या घरापर्यंत येईपर्यंतचा प्रवास आणखी धक्कादायक आहे. गटाराच्या आणि नाल्याच्या पाण्यावर भाज्या पिकतात त्याची धक्कादायक दृश्यं आम्ही तुमच्यासमोर आणली.... आता त्यापेक्षाही भयानक दृश्यं इथं पाहायला मिळाली. अतिशय खराब पाण्यात या पालेभाज्या धुतल्या जातात... ज्या पाण्यात जनावरं आंघोळ करतात, ज्या पाण्यात सांडपाणी सोडलं जातं, त्याच पाण्यात या भाज्या धुण्याचा उद्योग सुरू आहे. भाजीवाल्यांनीच याची कबुली दिली.
सर्वसामान्यांच्या घरात येणाऱ्या भाज्या कुठे पिकवल्या जातात? त्यासाठी कुठलं पाणी वापरलं जातं? त्या योग्य पाण्यात धुतल्या जातात का? प्रदूषण असलेलं विषाणू असलेलं पाणी भाज्या पिकवण्यासाठी वापरलं जातं का, या सगळ्यावर 'एफडीए'नं नजर ठेवणं गरजेचं आहे.