मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर आता काहीसा ओसरताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या जास्त आहे. राज्यात आजही कोरोनाबाधितांपेक्षा अधिक रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, राज्याचा रिकव्हरी रेट देखील वाढला आहे. राज्यात आज 6,270 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 13,758 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मृत्यूची संख्याही आज शंभरच्या खाली आहे. आज 94 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
राज्यातील रुग्ण बरं होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.89 टक्के इतका झालं आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,96,69,693 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,79, 051 (15.3 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 6,71,685 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,472 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईतही रुग्णसंख्या घटली
मुंबईतही कोरोनाचा आलेख घसरताना दिसत आहे. गेल्या 24 तासात 521 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर गेला आहे. सध्या मुंबईत 14,637 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 720 दिवसांवर गेला आहे.